विषबाधेमुळे २०० शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळावर कोसळला दुःखाचा डोंगर; मावळमधील घटना

मावळ : अन्नातून विषबाधा झाल्याने जवळपास २०० शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मावळ तालुक्यातील करंडोली, जवरेडोली येथे घडली. ह्या आपत्तीत गरीब मेंढपाळाचे सुमारे २५ लाख रूपयाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने पशुसंवर्धन विभागाने लागलीच घटनास्थळी धाव घेतल्याने उरलेल्या शेळ्या मेंढ्यांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

काळुराम शिवाजी बरकडे (मु. वनकुट ता. पारनेर जि. नगर) हे आपल्या बकऱ्यांचा वाडा घेऊन मावळ तालुक्यातील वाकसई, देवघर, करंडोली, जेवरेवाडी, वेहेरगाव, वरसोली या ठिकाणी शेतात बसत आणि उदरनिर्वाह करत आहेत. रविवारी वाकसई, देवघर, करंडोली, जेवरेवाडी गावाच्या वरील बाजूला असलेल्या डोंगर भागात त्यांच्या बकऱ्यांच्या खाण्यात काहीतरी आल्याने रविवारी (दि. २८ जानेवारी) मध्यरात्रीनंतर मंगळवार सकाळपर्यंत जवळपास १४९ बकऱ्यांचा मृत्यू झाला. सायंकाळपर्यंत हा आकडा २०० पर्यंत गेल्याची माहिती मिळाली आहे.

Advertisement

शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू होऊ लागल्याने मेंढपाळांनी तत्काळ गावातील नागरिकांना कळवले. नागरिकांनी मदतीसाठी मावळ तालुका पशू वैद्यकीय अधिकारी यांना बोलावून घेतले. वैद्यकीय पथकाने दोन दिवसांपासून बकऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केलेत. परंतू अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात पशूधन दगावल्याने गरिब धनगर बंधूवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

आम्ही रात्रंदिवस फिरून शेळ्या मेंढ्यांचा मुलांप्रमाणे सांभाळ करतो. आमच्या संसाराचा गाडा त्यांच्यावर चालतो. विषबाधा झाल्याने जवळपास २०० शेळ्या, मेंढ्यांचा मृत्यू झाला. शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई मिळावी. – काळुराम बरकडे, मेंढपाळ
या कळपात एकून ४०३ शेळ्या आणि मेंढ्या होत्या. २८ जानेवारीला कुजून पडलेले शिळे अन्न शेळ्या, मेंढ्यांनी खाल्ले. त्यामुळे कळपातील काही मेंढ्याचे पोट फुगले, तोंडावाटे पाणी येऊ लागले. आम्ही तपासणी केल्यानंतर विषबाधेने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. आमच्या टीमने रात्रंदिवस उपचार केले. त्यामुळे १०० ते १२५ शेळ्या मेंढ्यांचे प्राण वाचले. परंतू यामध्ये सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले असून त्याबाबत अहवाल तहसीलदार यांना सादर केला आहे. – पशुसंर्वधन विकास अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page