बेपत्ता झालेल्या अल्पवयीन चार मुली बारामती पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप घरी पोहोचल्या; एखाद्या चित्रपटात शोभेल असा बारामतीतील किस्सा
बारामती : शाळा बुडवून मैत्रिणीच्या वाढदिवसाची पार्टी करणाऱ्या चार अल्पवयीन मुली बारामती शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा सुखरूप आपल्या घरी पोहोचल्या एखाद्या चित्रपटात शोभावा असा किस्सा बुधवारी बारामतीत घडला.
बुधवार (दि. ७ फेब्रुवारी) शहरातील एका शाळेमध्ये शिकणाऱ्या १३ ते १५ वयोगटातील चार मुली रात्री नऊ वाजले तरी घरी आल्या नाहीत त्यामुळे चिंतेत असलेल्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. चारही मुलींना अज्ञात व्यक्तीने पळवल्याची शक्यता पालकांनी वर्तवली होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, या चार मुली बुधवारी (दि. ७ फेब्रुवारी) शाळेत जातो असे सांगून घरातून निघाल्या, मात्र त्यांनी शाळेत न जाता मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी शहरातील पुनावाला गार्डन गाठले. शाळेची वेळ संपल्यावर खूप वेळ होऊन देखील मुली घरी न आल्यामुळे पालकांनी मुलींचा शोध सुरू केला. शाळेत चौकशी केली असता मुली शाळेत आल्या नसल्याचे शाळेतील शिक्षकांकडून सांगण्यात आले. त्यापैकी एका पालकाला या मुली पुनावाला गार्डन परिसरात दिसल्या. मात्र त्याच वेळेस मुलींनीही पालकांना पाहिले. पालक रागावतील या भितीपोटी या चार मुलींपैकी एकीकडे असलेल्या दुचाकी वरून त्यांनी पळ काढला. यामध्ये मुलींनी बरमातीहून थेट पुणे गाठले. दरम्यानच्या काळात बारामती शहर पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांना पालकांनी ही माहिती दिली. त्यांनी लगेच तातडीने शोध सुरू केला.
खूप वेळ झाल्यावर मुलींनी देखील पुण्यातील रोशन पंजाबी या मुलाच्या मोबाईल वरून पालकांना फोन केला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांशी संपर्क साधला व मुलींना तेथे थांबवण्याची विनंती केली. त्यानंतर पालकांनी पुण्याला जाऊन मुलींना ताब्यात घेतले. पोलिसांनी तातडीने हालचाल केल्यामुळे तसेच बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवार यांनी देखील या प्रकरणी सहकार्य केल्यामुळे या चारही मुली आपल्या पालकांच्या घरी सुखरूप पोहोचल्या. सदर तपासात बारामती शहर पोलीस ठाण्याचे फौजदार युवराज घोडके पोलीस कर्मचारी श्रीकांत गोसावी बापू इंगोले यांनी मोलाचे सहकार्य केले.