पक्ष गेल्यावर सुप्रिया सुळेंना आठवला मराठी माणूस! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्णयावर माध्यमांशी बोलत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मराठी माणसाच्या विरोधात सातत्याने अदृष्य शक्ती जे निर्णय घेत असते त्याचं हे उदाहरण आहे. दरम्यान, पक्ष गेल्यावर सुप्रिया सुळेंना मराठी माणूस आठवल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. याबाबत अजित पवारांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही सगळे जण मराठीच आहोत, त्यामुळे पक्ष पळविण्याचा प्रश्न येतोच कुठे?
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, “हे अदृष्य शक्तींचं यश आहे. कारण ज्या माणसाने पक्ष स्थापन केला त्यांच्याकडूनच तो काढून घेणं हे या देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालं असेल. पण मला याबाबत काहीही आश्चर्य वाटत नाही कारण हे अपेक्षित होतं. महाराष्ट्राच्या विरोधात हे मोठं षडयंत्र आहे. शिवसेना हा मराठी माणसाचा पक्ष असून त्यांच्यासोबतही असंच केलं. पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षदेखील मराठी माणसाचा पक्ष आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने अदृष्य शक्ती जे निर्णय घेत असते त्याचं हे आणखी एक उदाहरण आहे.”
“शरद पवारांनी शुन्यातून पक्ष सुरु केला असून आज त्यांच्याकडून हा पक्ष काढून घेण्यात आला आहे. पण याचं मला काहीही आश्चर्य वाटत नाही. कारण जे शिवसेनेच्या बाबतीत जे झालं तेच आमच्याबाबतीत झालं. त्यांनी आमदारांचा नियम लावला आहे. पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आमदारांच्या संख्याबळावरून पक्ष ठरत नाही, तर संघटना ठरवते. संघटना ही अर्थातच शरद पवारांबरोबर आहे. त्यामुळे आम्ही या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहोत,” असेही त्या म्हणाल्या. परंतु सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी बोलताना “मराठी माणसांचा पक्ष” असा राष्ट्रवादी पक्षाचा उल्लेख केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला मात्र उधाण आले आहे.