हरिश्चंद्रीकरांच्या भुयारी मार्गासाठी अखेर ठरला मुहूर्त; गेली नऊ वर्षांच्या प्रयत्नांना यश
कापूरहोळ : पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री(ता.भोर) गावच्या हद्दीतील महामार्ग मृत्युचा सापळा झाला होता. या ठिकाणी अपघात होवून अनेकांना आपला जीव गमावावा लागला तर काहींना कायमचे अपंगत्वामुळे आपले जीवन असह्य झाले आहे. चुकीच्या पद्धतीने महामार्गाचे आरेखन आणि काही राजकीय नेत्यांनी केलेल्या हस्त क्षेपामुळे हरिश्चंद्रीकरांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला होता असा आरोप नागरिकांनी वारंवार केला होता. गावातील तरुण युवक आणि नागरिकांनी गेली नऊ वर्षे याला वाचा फोडून संघर्ष केला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील हरिश्चंद्री फाट्यावर अखेर भुयारी मार्गाचे कामाला २२ फेब्रुवारी रोजी सुरुवात होणार असल्याचे पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पश्चिम महाराष्ट्राचे अधिकारी राजेश कदम यांनी हरिश्चंद्री ग्रामस्थांना दि.८ फेब्रुवारी रोजी दिले आहे.
पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग हा हरिश्चंद्री गावाच्या मधून गेल्यामुळे हरिश्चंद्री ग्रामस्थांचे दळण वळण करण्यासाठी मोठी अडचण झाली होती. रस्त्यावरून शेतीच्या मशागतीच्या कामासाठी अलीकडे पलीकडे जाणे येणे, शेती मशागत करण्यासाठी लागणारी औजारे महामार्गाच्या पलीकडील बाजूला नेणे, गुरांना चाऱ्यासाठी रस्त्यापलिकडे येने-जाने सुद्धा अवघड झाले होते. गावातील नागरिकांना बाजारपेठेत जाणे लहान मूलांना शाळेत जाण्यासाठी महामार्गावरूनच जीव मुठीत घेऊन जावे-यावे लागत होते. याच गावातील ७ ते ८ नागरिकांचा या ठिकाणी अपघात होऊन त्यांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. या गोष्टींना कंटाळुन हरिश्चंद्री ग्रामस्थांनी गेली ८ ते ९ वर्षे आंदोलनाचा पवित्रा घेत उपोषणे केली. यामध्ये शोले स्टाईल पाणी टाकीवर आंदोलन, रास्ता रोको, अशी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली होती, अखेर आंदोलनाला यश मिळाल्याने हरिश्चंद्री ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.