वरवे खुर्द येथे तब्बल पावणे आठ लाखांची घरफोडी; राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावरील राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील वरवे खुर्द(ता.भोर) येथे घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. श्रीकांत शिवाजी खुटवड (वय २८ वर्ष, रा. वरवे खुर्द, ता. भोर) यांनी याबाबत राजगड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी(दि. १० फेब्रुवारी) पहाटे पाच ते सहाच्या सुमारास फिर्यादी श्रीकांत खुटवड हे ‘मॉर्निंग वॉक’ साठी गेले असता, चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घरामध्ये प्रवेश करून सोन्याचे मनी मंगळसुत्र, राणीहार, चैन असे तब्बल ६ लाख ८५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि त्यांच्या घरासमोर उभी असलेली काळ्या रंगाची पल्सर मोटार सायकल(एम एच १२ डब्लु एफ ०७८०) असा एकूण ७ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून पोबारा केला. ‘मॉर्निंग वॉक’ करून परत घरी आले असता घरात चोरी झाली असल्याचे खुटवड यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच राजगड पोलीस स्टेशन कडे धाव घेऊन सदर चोरी ही त्यांच्या इमारती मधील खोली मध्ये भाडेतत्वावर राहणारे तसेच घरातील सर्व माहीती असलेले ओमप्रकाश इंद्रलाल यादव आणि अमीर यादव (रा. अंतरैला ग्राम मध्यप्रदेश, ४८६११७) यांनी केली असल्याचा संशय व्यक्त केला असून त्यांच्या विरोधात राजगड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार चव्हाण करीत आहेत.