मनोज जरांगे पाटलांच्या पायी दिंडीचा चौथा दिवस, पदयात्रेला तुफान गर्दी; जरांगे पुण्यात धडकले
पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातून निघालेली मनोज जरांगे यांची पायी दिंडी पुण्यात दाखल झाली आहे. जालना , बीड आणि अहमदनगर असे तीन जिल्ह्यांचा प्रवास करून जरांगे पुणे जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तिसऱ्या दिवशी म्हणजेच २२ जानेवारीचा मुक्काम त्यांनी रांजणगाव गणपती येथे केला. आज सकाळी पुन्हा १० वाजता जरांगेंनी लाखो मराठ्यांसह मुंबईकडे कूच केली आहे. दरम्यान, आज दुपारच्या भोजनाचे नियोजन भीमा कोरेगाव येथे केले होते. तर, आजचा मुक्काम पुणे जिल्ह्यातील चंदननगर येथे केला जाणार आहे.
विशेष म्हणजे आज आणि उद्याचा प्रवास करून २६ जानेवारीला मनोज जरांगे मुंबईत धडकणार आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी यापूर्वी आंतरवाली सराटीत आमरण उपोषण केले. यावेळी दोनदा जरांगे यांनी सरकारला वेळ दिला होता. त्यामुळे आता मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर अमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. यासाठी २० जानेवारीपासून त्यांनी पायी दिंडी काढली आहे. त्यांच्या याच मुंबई आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. दरम्यान, जरांगे यांनी मुंबई आंदोलन स्थगित करावं अशी मागणी सत्ताधारी नेतेमंडळी आणि मंत्र्यांकडून केली जात आहे.
मात्र, आतापर्यंत सरकारला सात महिन्याचा वेळ दिला, यापुढे आता एक तास ही मिळणार नाही आणि आम्ही मुंबईत आंदोलन करणारच या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या पायी दिंडीत सहभागी होणाऱ्यांची संख्या मोठी असली, तरीही अनेकजण अजूनही या आंदोलनात सहभागी झाले नसल्याचं जरांगे म्हणाले आहे. आम्ही गनिमी काव्याने मुंबई गाठणार असल्याचे देखील जरांगे म्हणाले आहे. त्यामुळे 26 जानेवारीला मुंबईतील गल्ली-गल्लीत मराठे पाहायला मिळतील असा थेट इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला. २५ जानेवारीनंतर मुंबईत येणाऱ्या मराठा आंदोलकांची संख्या वाढण्याची शक्यता असून, २६ ला मुंबईत मोठी गर्दी होण्याची देखील शक्यता आहे.