बारामतीत अजित दादांचा उमेदवार ठरला? प्रचाराला धडाक्यात सुरुवात
बारामती : राज्यसभेच्या उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर आता लोकसभेसाठी तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध अजित पवार यांच्याकडून कोणता उमेदवार दिला जाणार याची चर्चा रंगली होती.
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात उतरतील अशा चर्चा होत्या. आता बारामतीत लोकसभेला सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. बारामती परिसरात सुनेत्रा पवार यांची माहिती आणि कामाचा आढावा सांगणारा प्रचार रथ फिरू लागला आहे.
बारामतीमधून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित समजली जातेय, अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, सुनेत्रा पवार यांचा प्रचाररथ बारामतीत फिरत आहे. त्यामुळे आता बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या नणंद भावजयीचा सामना दिसण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरू होती. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी एका कार्यक्रमात मी उमेदवार असल्याचं समजून लोकसभेला मतदान करा असं आवाहन केलं होतं.
खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बारामतीत कोण असणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. बारामतीत व्यापाऱ्यांच्या मेळाव्यात अजित पवार म्हणाले होते की, दोन्ही वेळेला मी सांगेन त्या उमेदवाराला मतदान करा, दोन्ही वेळेला मी उमेदवार आहे असं समजून मत द्या असं म्हणाले होते. अजित पवार यांचा आज अजित पवार यांचा बारामती दौरा आहे. राष्ट्रवादीच्या बूथ कमिटीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. या दौऱ्यात सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांनी कोणती विकासकामे केली याची माहिती या प्रचार रथातून दाखवली जात आहे.