फलटण तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकाऱ्यावर अपसंपदा जमवल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल

फलटण : फलटण तालुक्यातील बरड पशुवैद्यकीय दवाखान्यातील सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यावर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ लाख ८४ हजाराची अपसंपदा जमवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दिलीप महादेव नाझीरकर (वय ५५, रा. बारामती, जि. पुणे), असे संशयिताचे नाव आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विक्रम पवार यांनी फिर्याद दिली आहे. १९ जून २०११ ते ७ सप्टेंबर २०१९ दरम्यान सहाय्यक पशुधन विकास अधिकारी नाझीरकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून ज्ञात स्त्रोतापेक्षा (एकूण उत्पन्नाच्या २५.७ टक्के) १७ लाख ८४ हजाराची अपसंपदा जमवल्याचे निष्पन्न झाले असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. अपसंपदा बाळगल्या प्रकरणी नाझीरकर यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक सचिन राउत, विक्रम पवार यांच्यासह एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, पाच दिवसांपूर्वीच एसीबीने सातारा नगरपालिकेतील आरोग्य निरीक्षक प्रवीण यादव यांच्यावर देखील ११ लाखांची अपसंपदा जमवल्याचा गुन्हा दाखल केला होता. आठ दिवसात दोन लोकसेवकांवर गुन्हे दाखल झाल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page