लवासामध्ये दरड कोसळली, दोन बंगले मातीच्या ढीगाऱ्याखाली; अनेकजण बेपत्ता
मुळशी : पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या, पूरस्थिती निर्माण झाल्याच्या तर भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अशामध्ये पुण्यातील लवासा हिल स्टेशनवर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. दोन बंगल्यावर दरड कोसळली. या घटनेमध्ये २ ते ४ जण बेपत्ता झाले आहेत. घटनेची माहिती जिल्हाच प्रशासनाला देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील लवासा हिल स्टेशन येथे दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे दोन बंगले मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. या बंगल्यामध्ये राहणारे २ ते ४ जण बेपत्ता झाले असल्याची माहिती स्थानिक नागिरकांनी दिली. स्थानिक नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती दिली आहे. या घटनास्थळावरील फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.
पुणे जिल्ह्यात मागील २४ तासांत मुसळधार पाऊस पडला असून लवासा या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजेच ४५३.५ मिली मिटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. या विक्रमी पावसाचा फटका लवासा हिल स्टेशन या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना बसला आहे. याठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पुणे जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्षातून जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेत आहेत असं असलं तरी लवासा या ठिकाणी अजून पर्यंत प्रशासनाची कुठलीही मदत पोहचली नाही आहे. प्रशासनाचा एकही कर्मचारी घटनास्थळी नाही त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, पुण्यामध्ये पावसाचा हाहाकार आणि पूरस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशामध्ये नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.