जनावरांचा गोठा कोसळून एक म्हैस ठार तर एक गंभीर जखमी; भोर तालुक्यातील आंबवडे येथील घटना
भोर : भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील आंबवडे खोऱ्यातील आंबवडे(जेधेवाडी) येथील शेतकरी संभाजी दत्तात्रय जेधे यांचा जनावरांचा गोठा कोसळून एक म्हैस जागीच ठार झाली असून दुसरी म्हैस गंभीर जखमी असल्याची घटना आज रविवारी(दि.१४ जुलै) पहाटेच्या वेळी घडली.
तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सर्वत्र पावसाची रिमझिम सुरू आहे. भोर तालुका अतिवृष्टीचा असल्याने शेतकरी सर्वच जनावरे गोठ्यात एकत्रित बांधतात. सध्या पावसामुळे घरांच्या भिंती ओल्या होऊन भिजल्या आहेत.पावसाळ्यात घरे कोसळण्याचे प्रकार घडत असतानाच आंबवडे(जेधेवाडी) येथे आठ ते दहा जनावरे बांधलेला गोठा पूर्णपणे कोसळल्याने एक म्हैस ठार झाली. तर दुसरी म्हैस गंभीर जखमी असून इतरही तीन-चार जनावरे किरकोळ जखमी असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. या घटनेत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी तहसीलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी तात्काळ भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला प्रशासनाकडून आर्थिक मिळावी अशी मागणी आंबवडे खोऱ्यातील शेतकरी गटांकडून होत आहे.