केंजळच्या महावितरण उपकेंद्राचा प्रश्न सुटला; चंद्रकांत बाठेंचे आंदोलन मागे
किकवी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार केंजळ(ता.भोर) येथील गट नंबर ६८२ मधील ८० आर क्षेत्र विद्युत वितरण कंपनीला देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तांतरित केले जाणार आहे. यामुळे महावितरणकडून केंजळ येथे ३३/११ केव्ही क्षमतेचे उपकेंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महावितरणच्या उपकेंद्रासाठी आम्ही आंदोलन करणार नाही, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत बाठे यांनी दिली.
याबाबतचे आदेश राज्याच्या महसूल व वन (मदत व पुनर्वसन) विभागाचे उपसचिव डॉ. श्रीनिवास कोतवाल यांनी पुणे विभागाच्या आयुक्तांना दिले आहे. यामुळे भोर तालुक्याच्या पूर्वेकडील १८ गावांमधील बागायती क्षेत्राला योग्य प्रमाणात वीज पुरवठ्याचा मार्ग मोकळा होणार आहे. केंजळमध्ये महावितरणचे उपकेंद्र उभारण्यासाठी मंत्रालयीन स्तरावरील त्रुटींची पूर्तता करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे पुणे-सातारा महामार्गावर किकवी येथे आंदोलन करण्याचा इशारा चंद्रकांत बाठे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी दिला होता. त्यांनंतर या संदर्भात अजित पवार यांनी दि. २१ ला सदर विभागाच्या प्रधानसचिवांना त्वरित कार्यवाही करण्याची सूचना दिल्या होत्या. त्यानुसार संबंधित जमीन मराहाष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित यांना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करण्याचे आदेश उपसचिवांनी पुण्याच्या विभागीय आयुक्तांना दिले आहेत. यामुळे भोर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न सुटणार असल्याचे चंद्रकांत बाठे यांनी सांगितले.