सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा मॅरेथॉनचे उद्या आयोजन; ७ देशांतील खेळाडूंचाही सहभाग
पुणे : वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याला मानवंदना देण्यासाठी तसेच इतिहासाची साक्ष देणार्या सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा किल्ल्यांचे दर्शन घडवण्यासाठी अल्ट्रा ट्रेल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष दिग्विजय जेधे यांनी दिली.
अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा शनिवारी (दि.९ डिसेंबर) होणार आहे. सिंहगडाच्या पायथ्यापासून ते तोरणा किल्ल्यापर्यंत ते लिंगाणा सुळक्याच्या पायथ्यापर्यंत या मॅरेथॉनचा मार्ग असणार आहे. नॉर्वे, आइसलँड, फ्रान्स, स्पेन, साऊथ आफ्रिका, कॅनडा, नेपाळ या ७ देशांतील खेळाडूंसह, भारतातील २४ राज्य आणि ५५ शहरांतील एकूण ९०० हून अधिक स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ही मॅरेथॉन १०० किमी, ५३ किमी, २५ किमी व ११ किमी अशा वेगवेगळ्या विभागात घेतली जात आहे.
वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशनच्या वतीने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. पश्चिम घाटातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या परिसरात ही १०० किमीची मॅरेथॉन स्पर्धा स्पर्धकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरणारी आहे. या स्पर्धेत गोळेवाडी (डोणजे) ते सिंहगड ११ किमी, डोणजे-सिंहगड ते राजगड २५ किमी, डोणजे-तोरणा ५३ किमी आणि डोणजे ते लिंगाणा १०० किमी अशा चार अंतर श्रेणीमध्ये ही स्पर्धा आहे.महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभाग तसेच वन विभाग, पर्यटन विभाग, पुणे पोलिस व पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या विशेष सहकार्याने ही स्पर्धा होणार आहे.