कोडीत(बु) येथे अफूची शेती करणाऱ्यांवर गुन्हा दाखल; स्थानिक गुन्हे शाखा, राजगड पोलीस व सासवड पोलिसांची कामगिरी

सासवड : शेतात अफूची लागवड करणाऱ्या दोन शेतकऱ्यांना  स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई पुरंदर तालुक्यातील कोडीत (बु) गावातील मलाईवस्ती शिवारात करण्यात आली. या कारवाईत २१ हजार रुपये किमतीची १० किलो ५०० ग्रॅम वजनाची अफूची ओली बोंडे जप्त करण्यात आली आहेत. दशरथ सिताराम बडधे (वय ६५ वर्ष) व तान्हाजी निवृत्ती बडधे (वय ६९ वर्ष, दोघे रा. कोडीत बु. ता. पुरंदर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर सासवड पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना गोपनीय माहिती मिळाली की, पुरंदर तालुक्यातील कोडीत (बु) गावात दशरथ बडधे व तान्हाजी बडधे यांनी त्यांच्या शेतात बेकायदेशीरपणे अफूची लागवड करुन उत्पादन घेत आहेत. मिळालेल्या माहितीच्या पार्श्वभूमीवर पथकाने सासवड व राजगड पोलिसांच्या मदतीने कोडीत गावातील मलाईवस्ती येथे गेले. त्याठिकाणी दोन वेगवेगळ्या शेतात जाऊन पाहणी केली असता पिकांमध्ये आंतरपीक म्हणून अफू या अमली पदार्थाच्या झाडांची लागवड केल्याचे निदर्शनास आले. अफूची लागवड केलेली दिसून येऊ नये यासाठी शेतात कांदा व शेवंती फुलांची लागवड करण्यात आली होती.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, योगेश नागरगोजे, धिरज जाधव, दगडु विरकर, सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार सुरज नांगरे, जब्बार सय्यद, प्रतिक धिवार, कारंडे, भुजबळ यांच्या पथकाने केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकले करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page