मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला : भोर तालुक्यात साडे तीन हजार बहिणींच्या खात्यात “लाडकी बहिण याजने”चे १ कोटी रुपये जमा
भोर : राज्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे महिल्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे १७ ऑगस्ट २०२४ ला पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यापूर्वी १५ ऑगस्टचे निमित्त साधत राज्यातील बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यादरम्यान भोर तालुक्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ११ शाखेत एकूण १ कोटी २ लाख ४२ हजार रक्कम जमा झाली असून ३ हजार ४१४ बहिणींच्या खात्यात ही रक्कम जमा झाली असल्याची माहिती विभागीय अधिकारी विनोद काकडे यांनी दिली. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांची रक्कम शासनाने महिलांच्या खात्यांवर जमा केली असल्याने पैसे काढण्यासाठी जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने सुट्टीच्या दिवशीही बँका चालू ठेवण्यात आल्या असल्याचे चित्र सर्व ठिकाणी पहायला मिळाले.