भोर तालुक्यात जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची २८१ पदे रिक्त; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होतोय परिणाम
भोर : भोर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २७२ शाळांमधील शिक्षकांची मंजूर असलेल्या ७८९ पैकी २८१ पदे रिक्त असल्यामुळे कार्यरत असलेल्या शिक्षकांवर कामाचा ताण पडत आहे. यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने भोर तालुक्यातील शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी भोर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष व सचिवांनी पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
भोर तालुका हा डोंगराळ आणि अतीदुर्गम असूनही गेल्या आठ महिन्यांपासून तालुक्यातील शिक्षकांची २८१ पदे रिक्त आहेत. यामध्ये ६ मुख्याध्यापक, ९८ पदवीधर शिक्षक आणि १७७ उपशिक्षकांचा समावेश आहे. याशिवाय तालुक्यातील ४१ शाळांवर बदलीप्रक्रिया, सेवानिवृत्ती अशा कारणांमुळे शिक्षकच नाहीत. बदली प्रक्रियेमध्ये भोर तालुक्यात नेमणूक मिळालेल्या ४२ शिक्षकांनी न्यायालयात पिटीशन दाखल केल्याने ते शिक्षकही भोर तालुक्यात रुजू झालेले नाहीत. त्यामुळे शेजारच्या शाळेतील शिक्षक हे तेथे पाठविले जात आहेत. त्यामुळे कार्यरत शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होत आहे. तसेच भोरच्या ड़ोंगराळ भागात शिक्षक येण्यास तयार होत नाहीत. आणि अधिकारीही भोरकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे सध्या पवित्र पोर्टलव्दारे जिल्ह्यात नेमणूक मिळालेल्या शिक्षकांपैकी जास्तीत जास्त शिक्षकांची नेमणूक भोर तालुक्यात करावी अशी मागणी भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुदाम ओंबळे यांनी केली आहे.
