पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमालाच्या चोऱ्यांमध्ये वाढ
पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे-भाजीपाला, गूळ-भुसार बाजारात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. बाजारात सातत्याने चोऱ्या होत आहेत. ठरवून दिलेल्या संख्येत सुरक्षा रक्षक उपस्थित नसल्याने चोरांचे चांगलेच फावले आहे.
या चोऱ्यांबाबत अडते पोलिस आणि बाजार समितीकडे तक्रार देण्यास धजावत आहेत. याबाबत अडते असोसिएशन देखील मूग गिळून गप्प बसल्याचे सध्याचे चित्र आहे.
पुणे बाजार समितीमध्ये राज्य आणि परराज्यांतून मोठ्या प्रमाणावर फळे-भाजीपाल्यांची आवक होत आहे. बाजार आवारातील वाहतूक कोंडी आणि सुरक्षेसाठी भाजीपाला विभागात ८० सुरक्षा रक्षक आहेत. तर, गूळ- भुसार बाजारात ६३ सुरक्षा रक्षक आहेत. दोन्ही विभागात शेतमाल चोऱ्यांसह अनेक ठिकाणी कॅमेरा, एसीचे बॉक्स, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तोडफोडीच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत- दिलीप काळभोर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती,
पुणे शेतीमालाच्या चोरीच्या वाढलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. ८) अडते असोसिएशनचे अध्यक्ष, पदाधिकारी, अडतदार, ठेकेदार, उपसभापती, सचिव यांची संयुक्त बैठक घेतली. यापुढील काळात शेतीमालाच्या चोऱ्या झाल्यास नुकसानीचा खर्च हा संबंधित ठेकेदारांच्या बिलातून वजा करण्याचा निर्णय झाला आहे. शेतकरी, अडत्यांच्या हितासाठी चोऱ्या न थांबल्यास वेळप्रसंगी सुरक्षा रक्षक ठेकेदार बदलले जाईल. तर, संबंधित विभाग प्रमुखांनी, अधिकाऱ्यांनी वचक न ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. - सौरभ कुंजीर, उपाध्यक्ष, अडते असोसिएशन
बाजार आवारात फळे-भाजीपाला, लसूण, कांदा- बटाटा विभागांत बहुतांशी अडत्यांच्या शेतीमालाच्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. अडत्यांना दिवसेंदिवस बाजारपेठेत असुरक्षितता भासत आहे. वेळेवर देखभाल आणि सेस भरूनही शेतीमालाच्या चोऱ्या होत आहेत. व्यापाऱ्यांना जाचक त्रास सहन करावा लागत आहे.