एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी नाकारलं बारामती मध्ये शरद पवार यांचं घरी जेवायचं आमंत्रण!
बारामती : बारामती मध्ये २ व ३ मार्च दिवशी नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस बारामती मध्ये येणार आहे.
दरम्यान बारामती मध्ये येणार्या राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शरद पवार यांनी ‘गोविंदबाग’ या निवासस्थानी जेवणाचे आमंत्रण दिले होते. मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी ते नाकारलं आहे. कामाच्या व्यस्ततेमुळे या वेळेस शक्य नसल्याची माहिती पत्राद्वारा देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून जेवणाचं आमंत्रण नाकारल्याचं वृत्त समोर आलं आहे.
बारामती नंतर वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकांचे भूमिपूजन, त्यानंतर लगेचच आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन असे आणखी दोन मोठे कार्यक्रम असल्याने आपण येऊ शकत नसल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.
बारामती मध्ये २ व ३ मार्च दिवशी नमो रोजगार मेळावा आहे. या कार्यक्रमामध्ये पहिल्या निमंत्रण पत्रिकेत शरद पवार यांचं नाव टाळलं होतं. प्रशासनाने त्यानंतर निमंत्रण पत्रिकेत बदल करून नाव समाविष्ट केलं आहे. शरद पवार हे राज्यसभेचे खासदार असून ते राज्यसभेचं प्रतिनिधीत्व करतात, या कार्यक्रमाला राज्यातील लोकप्रतिनिधींना निमंत्रण नाही, असा अर्थ होतो, असं सुप्रिया सुळेंनी सांगितल्यावर सरकारने नवीन निमंत्रण पत्रिका काढून त्यामध्ये शरद पवार यांच्या नावाचा समावेश केल्याचं समोर आलं आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्त्व शरद पवार यांची लेक सुप्रिया सुळे करतात. तर विधानसभेमध्ये अजित पवार आमदार आहेत. येत्या काही दिवसांवर आता लोकसभेच्या निवडणूका आल्या आहेत. तत्पूर्वी येथे अनेक बेरोजगारांना नोकरी दिली जाणार आहे. तर निवडणूकीच्या रिंगणात सुप्रिया सुळेंसमोर अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यावी अशी नेते, कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. त्यामुळे ही निवडणूक नणंद विरूद्ध भावजय होण्याची दाट शक्यता आहे.