पुरदंरमध्ये अफुची शेती करण्याचा दुसरा प्रकार उघड, ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त; भोर व जेजुरी पोलिसांची कामगिरी

जेजुरी : पुरंदर तालुक्यातील मावडी क.प. ग्रामपंचायत हद्दीत ‘अफू’ या अमली पदार्थाची शेती करणाऱ्या दोघांना जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण कुंडलीक जगताप, वय ४० वर्ष) व रोहीदास चांगदेव जगताप (वय ५५ वर्ष , दोघे रा. कोडीत बु ता. पुरंदर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ७६ हजार ५६० रुपये किमतीची अफुची झाडे बोंडांसह जप्त केली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, मावडी क.प. (ता. पुरंदर) गावातील किरण जगताप व रोहीदास जगताप यांनी त्यांच्या शेतात विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे अफूची लागवड करून उत्पादन घेतले आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने जेजुरी व भोर पोलीस ठाण्यातील पोलीस मावडी क.प. गावातील कवठीचा मळा या ठिकाणी पोहोचले. कवठीचा मळा येथील दोन वेगवेगळ्या शेतात जात पाहणी केली असता, शेतामध्ये अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केल्याचे आढळून आले. त्यानंतर तेथे उपस्थित किरण जगताप व रोहीदास जगताप यांना ताब्यात घेण्यात आले.

Advertisement

दरम्यान, अफुची लागवड केलेली दिसू नये, याकरीता शेतात कांदा व लसून पिकाची लागवड करण्यात आलेली होती. सदर ठिकाणी ३८.२८ किलो ग्रॅम वजनाची ७६ हजार ५६० रुपयांची अफुची झाडे बोंडांसह जप्त करण्यात आली आहेत. वरील दोघांविरुद्ध जेजूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. तसेच पाच दिवसांपुर्वी पुरंदर तालुक्यातील कोडीत (बु) गावात स्थानिक गुन्हे शाखेने विनापरवाना अफुची लागवड करून उत्पादन घेणाऱ्या दोन इसमांवर कारवाई केलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास जेजूरी पोलीस करत आहेत.

सदरची कामगिरी भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब पवार, जेजूरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, नामदेव तारडे, पोलीस अंमलदार विठ्ठल कदम, शुभम भोसले, तात्यासाहेब खाडे, दशरथ बनसोडे, भानुदास सरक यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page