नयनरम्य निसर्ग सौंदर्य आणि रंगेबेरंगी फुलांनी सजले रायरेश्वर पठार
भोर : छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभू महादेवाला साक्ष ठेऊन आपल्या निवडक सवंगड्यांसह हिंदवी स्वराज्याचा संकल्प ज्या पवित्र भूमीमध्ये केला त्या श्री क्षेत्र रायरेश्वराचा परिसर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नयनरम्य निसर्ग सौंदर्य आणि रंगेबेरंगी रानफुलांनी बहरून गेला आहे. त्यामुळे रायरेश्वर आणि जवळच असलेल्या केंजळगडाला भेट देणाऱ्या हौशी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पहायला मिळत आहे.
पुण्यापासून साधारणपणे ७५ किलोमीटरवर असलेल्या आणि उंच डोंगरावर जवळपास १६ किलोमीटर लांब विस्तार असलेल्या रायरेश्वर पठाराचे निसर्ग सौदर्य विशेषतः पावसाळ्यात अत्यंत आल्हाददायक आणि नयनरम्य असते. वाऱ्याच्या मंजुळ स्वरात एकसारखी डोलणारी रंगेबेरंगी रानफुले, दाट धुके, गर्द झाडी, खोल दऱ्या, खळखळून वाहणारे धबधबे, उंच सुळके, चढाईसाठी डोंगरकड्याला जोडलेला लोखंडी जिना आणि जिना चढून गेल्यावर दिसणारे विस्तीर्ण पठार व त्यावरील नयनरम्य निसर्ग सौदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे.
साताऱ्यातील कास पठाराप्रमाणे रायरेश्वर पठारावरदेखील पावसाळ्यात हिरव्यागार गवतामध्ये कोली, गौरीहात, सोनकी, तेरडा, कारवी, पद, रानहळद, कुई, कोंबडा, भुई, आम्री अशा विविध जातीची आणि रंगाची रानफुले बहरून येतात. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रायरेश्वरवर निसर्गाचा अनुभव घेताघेता छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या महादेवाच्या मंदिरामध्ये बेलभंडारा वाहून हिंदवी स्वराज्याचा संकल्प केला ते पुरातन शिवमंदिर, जननी देवीचे मंदिर, शिवकालीन गोमुख कुंड, पांडवकालीन लेणी, सात रंगांची माती यासह विविध किल्ले, महाबळेश्वर आणि पाचगणीचेही दर्शन होते याशिवाय येथून पाऊस नसताना दिसणारे सूर्योदय आणि सुर्यास्ताचे विहंगम दृष्य पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहे.
सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये असलेल्या रायरेश्वरला जाण्यासाठी भोर आणि वाई असे दोन मार्ग आहेत त्यामुळे सातारा आणि पुणे या दोन्ही बाजूंनी मोठ्या संख्येने पर्यटक रायरेश्वरला येत आहेत. लहानापासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच निसर्ग पर्यटनासाठी सहज सोपे असलेल्या रायरेश्वरच्या पायथ्यापर्यंत खाजगी गाडी जाते त्यानंतर अत्यंत सोपी परंतु रोमहर्षक अशी १५ ते २० मिनिटांची चढाई चढल्यानंतर पठारावर जाण्यासाठी उपलब्ध असलेल्या लोखंडी जिन्याच्या मार्गाने चढून वर गेल्यावर प्रत्येकाला आकाशाला गवसणी घातल्याचा भास होतो. रायरेश्वर येथे मांसाहार वर्ज असून स्थानिक रहिवाश्यांना पूर्वकल्पना दिल्यास उत्तम प्रकारचे शाकाहारी जेवण उपलब्ध होते. मग काय, पर्यटकांनो रायरेश्वर पठारावर येताय ना?