भोर तालुक्यातील “टोळ भैरवी” पासून सावध रहा: महाविकास आघाडीच्या बैठकीत आमदार संग्राम थोपटेंचा सुप्रिया सुळेंना खोचक सल्ला
नसरापूर : माळेगाव(नसरापूर, ता.भोर) येथे आज शनिवारी(दि. २ मार्च) येणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. यावेळी सुप्रिया सुळें सोबत, आमदार संग्राम थोपटे आणि पुणे जिल्हा उ.बा.ठा. शिवसेना जिल्हा संघटक कुलदीप कोंडेही उपस्थित होते. यावेळी सर्वांनीच विरोधकांवर सडकून टीका केली.
बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधताना सुरुवात भोर विधानसभा काँग्रेस अध्यक्ष शैलेश सोनवणे यांनी केली, त्यांनी “लोकसभेला आघाडी आणि विधानसभेला बिघाडी” असे होऊ देऊ नका असा सल्ला सुप्रिया सुळेंना दिला. यावर समोर बसलेल्या कार्यकर्त्यांमधून एकाने “ही गोष्ट जमलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून लिहून घ्या” असा आवाज दिला आणि सभागृहात एकच हशा पिकला. तसेच “ठराविक मंडळी एमआयडीसीला स्वतः विरोध करत होतीत आणि आता याच विषयाचे भांडवल करीत आहेत” अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली.
बैठकीत पुढे “निष्ठेचे दुसरे नाव संग्राम दादा थोपटे, दादा सांगतील तेच धोरण आणि दादा बांधतील तेच तोरण” हाच विचार आमचा असल्याचे मुळशी तालुका काँग्रेस अध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी सांगितले. तसेच पुढे, “ज्यांनी पक्ष चोरला अशा चोरांना गाडण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे” असे वक्तव्य वेल्हा तालुका उ.बा.ठा. शिवसेना तालुका प्रमुख दिपक दामगुडे यांनी केले. पुढे लवांडे बोलताना म्हणाले की, “संग्राम दादांना मंत्रिपद न मिळण्यासाठी कोणी पायात पाय घातला हे आपल्याला माहिती आहेच”.
“उ.बा.ठा. शिवसेना ही पूर्णपणे ताकदीने आणि खंबीरपणे सुप्रिया सुळेंच्या मागे उभी राहील, तसेच मावळ-बारे जनतेच्या नादी लागणे एवढे सोप्पे नाही.” हे आपण विरोधकांना दाखवून देणार असल्याचे यावेळी पुणे जिल्हा संघटक कुलदीप कोंडे यांनी सांगितले.
यानंतर पुढे आमदार संग्राम थोपटे बोलले की, माझ्या बाबतीत जनतेच्या मनात कायमच संभ्रम निर्माण केला जातो. या संभ्रमाचे निराकरण बैठकीच्या निमित्ताने झाले पाहिजे. मी कायम काँग्रेसशी एकनिष्ठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ज्या मावळ्यांना हाक मारली, त्या मावळ्यांनी महाराजांना साथ देण्याचे काम या मातीने केले आहे. मागील काही दिवसांमध्ये पवार साहेबांना भेटण्याचा योग आला, त्यावेळेस त्यांच्या डोळ्यांमधले तेज पाहिले. त्यामध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याचा बाणा आणि कार्यतत्परता पाहायला मिळते. तसेच “या भोर तालुक्यातील टोळ भैरवी पासून सावध रहा” असा खोचक सल्लाही सुप्रिया सुळेंना संग्राम थोपटे यांनी दिला. तसेच या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्व मतभेद विसरून सर्वांनी एकत्र यावे असे आवाहनही उपस्थितांना त्यांनी यावेळेस केले. तसेच ९ मार्च रोजी हरिश्चंद्री(कापूरहोळ) येथे भोर-वेल्हा तालुक्याच्या स्वाभिमानाचा मेळावा होणार असून यासाठी शरद पवारही उपस्थित राहणार असल्याचे थोपटे यांनी सांगितले.
यानंतर सुप्रिया सुळेंनी भाषणाला सुरुवात केली, त्यांनी सुरुवातीलाच “ही लढाई वैयक्तिक न राहता वैचारिक झालेली आहे, तसेच ही लढाई महाराष्ट्राची नाही तर दिल्लीच्या तख्ताची आहे.” असे सांगितले. तसेच हे सरकार “खर्च केंद्र सरकारचा, जाहिरात मात्र स्वतःची. असे करून सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत आहे.”
पुढे विरोधकांवर निशाणा साधताना त्या बोलल्या की, विरोधक म्हणत आहेत की आम्ही भोरसाठी काहीच केले नाही. त्यांना माझे एकच सांगणे आहे की भोरमध्ये वीज कोण आणली? रस्ते, पाणी, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, अंगणवाडी कोणी आणल्या? आशा वर्कर्स चे काम कोणी सुरू केले? मोबाईल, व्हाट्सअप, तुम्ही बघताय ते चॅनल्स कोणी आणले? बँका, साखर कारखाने कोणी आणले? सगळे काँग्रेसच्याच काळात आले.
पुढे त्या म्हणाल्या की, “संग्रामदादा, हमारी सबसे बडी ताकत हमारी इमानदारी है”. आपले पवार आणि थोपटे कुटुंबीय दोघेही लढवय्ये आहेत. ते कधीही कोणासमोर झुकले नाहीत. दोघांच्या आईने त्यांना काय खायला घातले असेल माहिती नाही, त्यांची लढाई करण्याची जिद्द काही संपत नाही. पुढे बोलताना त्यांनी अनंतराव थोपटेंच्या एकनिष्ठेला सलाम करत आभार मानले.
कुलदीप कोंडे यांच्या बाबत बोलताना त्या म्हणाल्या की माझा तात्यांपेक्षा जास्त जीव त्यांच्या पत्नी शलाकावर आहे. पुढे त्या बोलल्या की, “आता हळूहळू दिल्ली वाले ही येतील आणि काहीही भाषण करतील आपण फक्त ऐकायचे”, असा सल्ला उपस्थितांना सुप्रिया सुळे यांनी दिला.
आता पुढची लढाई कशी ताकतीने लढायची यावर ९ मार्चला चर्चा करू आणि आघाडीच्या बाबतीत तीन जणांचा एक ग्रुप करून मतदारसंघातील संपूर्ण नियोजन करू. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मी माझी उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडी ही निवडणूक ताकदीने लढेल, असे त्यांनी शेवटी सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी महाविकास आघाडीचे शैलेश सोनवणे, संतोष रेणुसे, रवींद्र बांदल, विठ्ठल आवाळे, अतुल किंद्रे, माऊली शिंदे, पोपटराव सुके, मानसिंग बाबा धुमाळ, लाहूनाना शेलार, भरत बोबडे, यशवंत डाळ, के.डी. सोनवणे, गणेश खुटवड, प्रमोद लोहोकरे, सविता दगडे, विकास लवांडे, महेश टापरे, प्रतापराव शेळीमकर, रमेश शिंदे, प्रदीप मरळ, शंकर नाना भूरूक, भगवानराव बांदल, शिवनाना कोंडे, आदित्य बोरगे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे बहरदार सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.