नको आता MIDC चं गाजर, करूयात आता बदलाचा जागर.,! भोरच्या “त्या” फलकाची सगळीकडे चर्चा
भोर : लोकसभेच्या निवडणुका येत्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. असे असले तरी, तालुक्यातील वर्षांनुवर्षे प्रलंबित असलेल्या MIDC च्या प्रश्नावर निवडणुका आल्या की नेते मंडळी भाषणे गाजविताना दिसतात. निवडणूका झाल्या की या विषयाकडे कोणी गांभीर्याने लक्षही देत नाही. अशी काहीशी परिस्थिती भोर तालुक्याची आहे. निवडणुकी मध्ये हा मुद्दा घेऊन अनेक नेते मंडळी आम्ही आता हा प्रश्न लवकरच मार्गी लावू असे सांगत गेली कित्येक वर्षे भोर वासियांची दिशाभूल करताना दिसत आहेत. परंतु या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर MIDC चा प्रश्न चांगलाच चिघळला असल्याचे दिसून येत आहे. यानिमित्ताने “नको आता MIDC चं गाजर, करूयात आता बदलाचा जागर”.,! अशा आशयाचे फलक सध्या भोर शहरात पहायला मिळत आहेत.
“त्या” व्हॉट्सॲप ग्रुप वर भोर मधील तरुण व्यक्त करतोय MIDC ची खंत
काही दिवसांपूर्वी म्हणजे ६ एप्रिल २०२४ रोजी भोर मधील युवकांनी तयार केलेला “व्हॉट्सॲप ग्रुप” तरुणांचे व्यासपीठ बनला आहे. या लोकसभा निवडणुकीत पुन्हा MIDC चे आश्वासने मिळू लागल्याने भोरमधील तरुण प्रचंड नाराज झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे जो नेता भोरला MIDC आणण्यासाठी प्रयत्न करेल त्यांच्याच पाठीशी उभे राहण्याची चर्चा या ग्रुप वर तरुण व्यक्त करताना दिसत आहेत. या ग्रुपच्या वर्णन विभागामध्ये “अष्म युगात जाऊ लाकडांनी शिकार करू, कंद मूळे खाऊ, पण एमआयडीसीलां विरोध करणाऱ्यांना मतदान करणार नाही. आम्ही भोरच्या विकासाबरोबर” अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे.
उद्योगांअभावी तरुणांचे स्थलांतर; गावात फक्त ज्येष्ठांचा वावर
भोर-राजगड तालुक्यातील काही गावांमध्ये फक्त ज्येष्ठांचा वापर पाहायला मिळत आहे. गावातील तरुण रोजगारा अभावी स्थलांतरित होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण सण-समारंभाच्या निमित्ताने स्थलांतरित झालेला तरुण वर्ग पुन्हा गावात आल्यानंतर एक प्रकारचा उत्साह गावात निर्माण होतो. परंतु तो वर्ग शहराच्या दिशेने पुन्हा मार्गस्थ होताच गाव पुन्हा ओस पडते. गावात तरुणाई नसल्यामुळे गावाचा विकास खुंटतो. त्यामुळे तालुक्यातच MIDC च्या माध्यमातून रोजगार निर्मिती झाल्यास तरुणवर्ग स्थलांतरित न होता. गावचा व तालुक्याचा विकास होण्यात त्यांचा हातभार नक्की लागेल, अशा भावना तरुणाई व्यक्त करताना दिसत आहे.
या लोकसभा निवडणुकीत MIDC आणि बेरोजगारीचा मुद्दा राहणार अग्रस्थानी
तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी भोर तालुक्यात ‘एमआयडीसी’ची गरज आहे. तालुक्यांत जमीन, पाणी, रस्ते, राष्ट्रीय महामार्ग व इतर सोयी सुविधा असूनही केवळ औद्योगिक विकासाअभावी बेरोजगार तरुणांची संख्या वाढत आहे. ‘एमआयडीसी’च्या माध्यमातून तरुणांना रोजगार तर उपलब्ध होईल. त्याबरोबर विविध पूरक असे छोटे-मोठे व्यवसायही सुरू होतील. केवळ स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध नसल्याने नाइलाजाने तरुणांना इतर ठिकाणी रोजगारासाठी जावे लागत आहे, त्यामुळे भोर तसेच तालुक्यातील इतर मोठ्या गावांच्या बाजारपेठाही मोठ्या प्रमाणात उलाढाल होत नसल्याने थंड आहेत. परंतु या लोकसभा निवडणुकीत MIDC च्या मुद्द्यावर भोर शहर व तालुक्यातील तरुण मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला पहायला मिळत असून या लोकसभा निवडणुकीत MIDC आणि बेरोजगारीचा मुद्दा अग्रस्थानी राहणार हे मात्र नक्की.