शिवरायांच्या कालगणनेस ३५० वर्षे पूर्ण; शिवराज्याभिषेक शक २७५ च्या नोंदी आढळल्या, भोर संस्थानमध्ये झालेल्या नोंदीत विशेष उल्लेख

निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास व त्यांनी सुरू केलेल्या राज्याभिषेक शक कालगणनेला यंदा ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या कालगणनेचा उल्लेख तत्कालीन भोर संस्थानातील राजगड, तोरण्यासह गावोगावच्या जन्म-मृत्यू रजिस्टरमध्ये आढळला आहे. त्यामुळे या दस्ताला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ६ जून १६७४ (शालिवाहन शके १५९६, ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी) रोजी राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगी शिवरायांनी ‘राज्याभिषेक शक’ ही नवीन कालगणना सुरू केली. महाराजांनी ‘क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपति’ असा किताब धारण केला. जुन्या कागदपत्रात या शकाचा उल्लेख ‘स्वस्तिश्री राज्याभिषेक शके’, किंवा संक्षिप्त रूपात ‘राजशक’ असा केला जात होता. असे मोडी लिपी इतिहास आणि पुरातत्त्व अभ्यासक डॉ.नंदकिशोर ज. मते यांनी सांगितले.

शिवरायांच्या कालगणनेचा भोर संस्थांनाने गौरव केला असल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे. छत्रपती शिवरायांनी श्रीरायरेश्वरावर १६४५ साली हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. या ऐतिहासिक घटनेस तीनशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यासाठी भोर संस्थांनचे राजे रघुनाथराव पंतसचिव यांनी १९४५ मध्ये नसरापूर-चेलाडी फाट्यावर मराठा स्मारक स्तंभ उभारला. स्तंभावर छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांसोबत स्वराज्याची शपथ घेत आहेत, असे शिल्प आहे.

Advertisement

भोर संस्थान मध्ये प्रचंडगड, राजगड हे तत्कालीन तालुके होते. यातील गावांच्या १९४६ ते १९५० मधील जन्म-मृत्यूच्या नोंदी असलेल्या रजिस्टरच्या मुख्य पानावर ‘राजशक’ चा उल्लेख आहे. यासोबत ‘इंग्रजी’ आणि मुस्लिम ‘फसली’ या कालगणनेचा उल्लेख आढळतो. यावेळी, ‘राजशक’ चा उल्लेख का केला असावा, याचा अंदाज बांधला असता. प्रामुख्याने १९४७ मध्ये देश स्वतंत्र्य झाला. त्यावर्षी २७३वे ‘राजशक’ सुरु होते. त्यानंतर, १९४९ साली २७५ वे, आणि १९५० मध्ये २७६वे ‘राजशक’ सुरु होते. म्हणून हा उल्लेख असावा. त्यानंतरच्या काळातील नोंदीत फक्त इंग्रजी कालगणना वापरली आहे. असे डॉ.मते यांनी सांगितले.

कोणत्या गावात उल्लेख?
‘राजशक’ अशी नोंद असलेली गावे सध्या वेल्हे- मुळशी तालुक्यातील आहेत. यामध्ये साखर, कुरवटी, पोळे, खानू, लाशीरगाव, रांजणे, फणसी, साईव, शेणवडी, ओसाडे, पाल, निवी, पासली, निगडे, मोरावणे, मांगदरी, माणगाव, लव्ही, मोहरी, माजगाव, मार्गासनी, दमगुडा आसनी, अस्कवडी, आडवली, मोसे, चांदर, भालवडी, भागीनघर, बालवडी, चिखली, घिसर, कोळवडी, डावजे, मालवली, कुरण, पाबे इत्यादी या गावांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page