राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनार लुट प्रकरणातील ७ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई; सहा आरोपी ताब्यात, एक अजूनही फरार
नसरापूर : राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवापुरवाडा(ता.हवेली) येथील ज्वेलर्स मालकाच्या तोंडावर स्प्रे मारुन सोन्याच्या दागिन्यांची पिशवी पळवुन नेणारया ७ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये साहील हनिफ पटेल उर्फ विराज विजय शिंदे(वय २१ वर्ष, रा. आंबेडकर वसाहत पुणे),रोहीत उर्फ बाबा प्रकाश साठे(वय २५ वर्ष रा.सहकारनगर पुणे),निखिल भगवंत कांबळे(वय २८ वर्ष, रा.अप्पर पुणे), निलेश दशरथ झांजे(वय २५ रा. वडगाव झांजे ता.वेल्हा),शफीक मकसुद हावरी(वय १९ वर्ष, रा.इंदिरानगर पुणे), निलेश पांडुरंग डिंबळे(वय ३० वर्ष, रा.कल्याण ता.हवेली) यांना अटक करण्यात आली असून आदित्य उर्फ पंछी विनायक डोळस(रा.अप्पर इंदिरानगर, पुणे) हा आरोपी अद्याप फरार आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
५ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शिवापुर वाडा(ता.हवेली) येथील ज्वेलर्सचे मालक यशवंत राजाराम महामुनी हे दुकान बंद करुन दुकानातील सोने घेऊन पायी घरी जात असताना दोन दुचाकी वरुन आलेल्या आरोपींनी त्यांच्याकडील सुमारे ६ लाख ५८ हजार रुपये किंमतीच्या दागिन्यांच लुट केली होती. या प्रकरणी राजगड पोलिसांनी तपास करुन या गुन्ह्यातील सात पैकी सहा आरोपींना अटक करुन त्यांच्याकडुन गुन्ह्यातील सोन्याचे दागिने हस्तगत केले होते. तसेच गुन्ह्यात वापरलेली एक पल्सर गाडी व अँक्टिवा गाडी, पाच मोबाईलही जप्त करण्यात आले होते. सदर आरोपींवर कारवाई करुन हे आरोपी न्यायालयीन कस्टडी मध्ये येरवडा कारागृहात जमा आहेत.
आरोपींनी संघटीतपणे टोळीच्या वर्चस्वासाठी अनेक गुन्हे केल्याचे निप्षन्न
सदर गुन्ह्यातील आरोपी साहील हनिफ पटेल(वय २१ वर्ष, आंबेडकर वसाहत लक्ष्मीनगर, पुणे) याने त्याची वरील आरोपींसह टोळी तयार करुन संघटीतपणे टोळीच्या वर्चस्वासाठी अनेक गुन्हे केल्याचे निप्षन्न झाले असल्याने त्यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमा नुसार कारवाई होण्या बाबत प्रस्ताव पुणे जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालया मार्फत विशेष पोलिस महानिरिक्षक कोल्हापुर परिक्षेत्र यांचेकडे देण्यात आला होता. त्यास पोलिस महानिरीक्षक यांनी मंजुरी दिली असुन आता साहील पटेल व त्याच्या टोळी विरुध्द मोक्का अंतर्गत देखिल कारवाई करण्यात आली आहे. या बाबत पुढील तपास भोर विभाग सासवडचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे हे करीत आहेत.