“मोदी करतील ते गुजरातसाठीच, पवार करतील ते बारामतीसाठीच नाही का?” भोर-वेल्ह्यातील जनतेचा सवाल
भोर : “मोदी पंतप्रधान आहेत त्यांनी हिंदुस्थानचा विचार केला पाहिजे. पंतप्रधान सबंध देशाचा असतो. तो एका राज्याचा नसतो. गेली दहा वर्षातले तुम्ही सगळे निकाल बघा. त्यांचे लक्ष सगळे एका राज्याकडे ते म्हणजे गुजरात. बाकीची राज्य दरिद्री ठेवायची आणि फक्त गुजरातचा विकास करायचा. एका राज्याचा विचार करणारा, देशाचा प्रमुख होऊ शकत नाही”. अशी बोचरी टीका शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हरिश्चंद्री(ता.भोर) येथील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात केली.
परंतु मोदी करतील ते गुजरात साठी, तर पवार करतील ते बारामतीसाठी नाही का? असा सवाल यानिमित्ताने भोर-वेल्ह्यातील जनतेने उपस्थित केला आहे. पवारांनी केलेल्या वक्तव्याप्रमाने प्रमाणे मोदी इतर राज्यांच्या तुलनेत गुजरात कडे जास्त लक्ष देत आहेत, तर त्याचप्रमाणे पवारही बारामती लोकसभा मतदार संघात इतर तालुक्यांच्या तुलनेत फक्त बारामती वर विशेष प्रेम दाखवत नाहीत का? हा प्रश्न भोर-वेल्ह्यातील जनता विचारत आहे. बारामती लोकसभा मतदार संघात ६ विधानसभा मतदार संघ येतात. त्यामध्ये दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, खडकवासला यांचा समावेश आहे. यामधील भोर विधानसभा मतदार संघातील भोर-वेल्ह्याचा विचार केला तर ते बारामती च्या तुलनेत दूरवर कुठेच दिसत नाहीत.
या मध्ये बारामती मधील सुसज्ज शाळा, कॉलेज, मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल, उच्च शासकीय कार्यालये, न्यायालये, कृषी महाविद्यालय, दळण वळणासाठी असलेले सुंदर आणि मोठे रस्ते, एम.आय.डी.सी., मोठी सभागृहे, नाट्यगृहे, क्रिकेट स्टेडियम, मोठ-मोठी वस्तु दर्शनालये, अत्याधुनिक बसस्थानके अशा बऱ्याचश्या गोष्टी पाहता सर्वच बाजूने बारामती परिपूर्ण आहे. पण याच तुलनेत बारामतीच्या वैभवात भर टाकण्यासाठी पाणी पुरवणाऱ्या भोर-वेल्ह्याची अवस्था मात्र भीषण आहे. वेल्हे तालुक्यातील काही वस्त्यांवर तर अजून वीज देखील पोहोचली नाही. गावाला जाण्यासाठी साधे रस्तेही नाहीयेत. तालुक्यात रोजगार नसल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे या तालुक्यातील मोडकळीस आलेल्या शाळांमध्ये शिकायला विद्यार्थीही नाहीत. तसेच ऐतिहासिक आणि पर्यटन दृष्टया भोर-वेल्हा तालुका परिपुर्ण असतानाही कोणतेही विकासात्मक व धोरणात्मक निर्णय का घेतले गेले नाहीत? तसेच पर्यटनस्थळ बनविण्यासाठी ठोस पावले का उचलली नाहीत? हा प्रश्न भोर-वेल्ह्यातील नागरिक उपस्थित करीत आहेत.