कात्रजमधील एजंटवर परस्पर इनोव्हा कार विकून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
पुणे : गाडी विकण्याच्या बहाण्याने इनोव्हा कार घेऊन जाऊन गाडी परस्पर विकून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी कात्रजमधील गाडी खरेदी विक्री करणाऱ्या एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संकेत संजय यादव (वय २५ वर्षे,रा.सुखसागर नगर, कात्रज, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित पाटील (रा. वंडरसीटी, कात्रज) याच्यावर आयपीसी ४०६, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी रोहित पाटील हा गाडी खरेदी व विक्री करणारा एजंट आहे.
फिर्यादी यांना त्यांची इनोव्हा कार (एमएच १२ एचझेड ५१७६) विकायची होती. त्यामुळे त्यांनी रोहित याच्याशी संपर्क साधला.
आरोपीने फिर्यादी यांची कार विकण्याच्या बहाण्याने कार आणि गाडीचे कागदपत्र घेऊन गेला. त्यानंतर त्याने फिर्यादी यांच्या परस्पर गाडी दुसऱ्याला विकून आर्थिक फसवणूक केली. आरोपीने गाडी विकून आलेले पैसे तसेच गाडी परत न करता फिर्य़ादी यांची फसवणूक केली. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.