शरद पवारांमुळे ग्रामीण भागात दहशतवादाचा उगम, एक राक्षस तर दुसरा ब्रह्मराक्षस, शिवतारेंचा अजित पवारांवरही निशाणा

सासवड : शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते विजय शिवतारे यांनी आज (दि. २४ मार्च) बारामती लोकसभा मतदारसंघातील त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत आपली अखेरची भूमिका स्पष्ट केली आहे.

१२ मार्चला १२ वाजता अपक्ष उमेदवार म्हणून विजय शिवतारे आपली उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे १२ तारखेला १२ वाजता उमेदवारी अर्ज भरत विरोधकांचे १२ वाजवणार, असा प्रण घेतल्याचे विजय शिवतारे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. पण याबाबता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कारवाई करण्यात येते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधत पवार कुटुंबाविरोधातील आक्रमक भूमिका कायम ठेवली. याचवेळी त्यांनी बारामती लोकसभेसाठी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादीकडून गैरसमज पसरवले जात आहेत. मी शरद पवार यांचा माणूस असल्याचे सांगितले जातं आहे. मात्र मला फक्त अजित पवार यांचा पराभव करायचा आहे. मी लढतोय ते जिंकण्यासाठी. त्यामुळे १ तारखेला पालखी तळावर सभा घेणार आणि १२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा शिवतारेंकडून करण्यात आली आहे.

Advertisement

पुढे बोलताना शिवतारे म्हणाले की, शरद पवारांमुळे ग्रामीण दहशतवाद पसरला आणि तो पुढे अजित पवारांनी नेला, असा गंभीर आरोप करत शिवतारे म्हणाले की, माझ्या माणसांना त्रास दिला जात आहे. अजित पवारांनी खूप पाप केली आहेत. अख्ख्या राज्याला ग्रामीण दहशतवाद शब्द माहिती पडेल. ७० वर्षात त्यांनी काय केले? तर, फक्त घुसले आणि घुसखोरी केली. ईस्ट इंडिया कंपनी आहे ती गेली आणि पवारांची कंपनी आली. अजित पवार आणि शरद पवार म्हणजे एक राक्षस आणि दुसरा ब्रह्मराक्षस हसून दोघांचा खात्मा करायचा आहे, असेही शिवतारेंनी सांगितले.

तसेच, १ एप्रिलला लोकसभा निवडणुकीचे बिगुल पालखी तळावरील सभेच्या माध्यमातून वाजवण्यात येईल. त्यानंतर अपक्ष म्हणून मिळालेले उमेदवारीचे चिन्ह गावागावांतील घरांमध्ये पोहोचवण्यात येईल. त्यामुळे पुरंदरमधील सर्वपक्षीय नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात येणार आहे. तसेच, गावागावात जाऊन विजय शिवतारे निवडणूक लढवणार आहेत, असे जाऊन सांगा, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर, बारामती लोकसभा मतदारसंघातील पाचही विधानसभा मतदारसंघामध्ये जनजागृती सभा घेऊन आपले म्हणणे आणि विचार जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचे विजय शिवतारे यांनी सांगितले. त्यामुळे आता विजय शिवतारे हे बारामती लोकसभेतून निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे पहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page