घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू, प्रशासनाने दरड प्रवन धानवलीतील नागरिकांचे केले स्थलांतर; आपत्ती व्यवस्थापन कक्ष अलर्ट मोडवर

भोर : तालुक्यातील सह्याद्री डोंगरांच्या घाटमाथ्यावर वादळी वा-यासह मुसळधार पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. झाडे उन्मळून पडणे, वीजेचे खांब कोसळणे, वादळी वा-यामुळे घरांचे छप्पर उडणे, भिंती पडणे, दरडी कोसळणे आणि वाहतूक बंद होणे असे प्रकार घ़डत आहेत. तालुका प्रशासनाने सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर दरड प्रवन धानवली(ता. भोर) येथील ५० ते ६० नागरिकांचे स्थलांतर धारांबे येथील मठात करण्यात आले असल्याची माहिती भोर प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.

तालुक्यात सर्वच ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे अधिकारी भोरचे तहसीलदार सचिन पाटील पोलीस, अप्पर तहसीलदार पुनम अहिरे, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार, तसेच संबंधित ठिकाणचे सर्कल, तलाठी, कोतवाल यांनी तालुक्यात बहुतांशी ठिकाणी समक्ष गावं आढावा घेतला.

Advertisement

नीरा नदीचे उगमस्थानी सर्वाधिक पावसाची नोंद
मागील चोवी तासात भाटघर धरणाच्या कुरुंजी येथे आणि निरा-देवघरच्या धरणाच्या नीरा नदीचे उगमस्थान असलेल्या शिरगाव येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी (दि.२५ जुलै) सकाळी सात वाजता कुरुंजी येथे २४८ मिलीमीटर आणि भूतोंडे येथे २४३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

नागरिकांनी सावधगिरी बाळगावी
भोर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि घाटातील गावांमधील शेतक-यांनी शेतातील कामे करताना विशेष काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले असून शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षासह सर्व शासकीय कर्मचा-यांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. नैसर्गीक आपत्ती व अपघात प्रसंगी तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष (फोन नंबर ०२११३- २२२५३९), पोलिस ठाणे ( फोन नंबर ०२११३-२२२५३३) आदींसोबत गाव कामगार तलाठी आणि मंडलाधिकारी कार्यालयांशी त्वरीत संपर्क साधावा असेही तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page