बारामतीचे महत्त्व राजकीय दृष्ट्या आत्ता वाढलेले दिसत असले तरीही, पेशव्यांच्या काळात मोहीम कोणतीही असू द्या पेशव्यांना पैशांचा पुरवठा बारामतीमधूनच व्हायचा
निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात मराठी सेनेने नर्मदापार घोडदौड केली. नानासाहेब पेशव्यांच्या काळात मराठे अटकेपार जाऊन पोहचले. महादजी शिंदेनी तर दिल्लीच्या गादीवर वचक बसवला. पेशावर ते तंजावर सगळीकडे मराठा साम्राज्य पसरले होते. मराठा साम्राज्याच्या या पराक्रमात लढाईमध्ये लढणाऱ्या शूरवीरांचा वाटा तर होताच मात्र या यशात सैन्य शक्ती सोबत धनशक्तीचा देखील सिंहाचा वाटा होता. देशभर घोडदौड करणाऱ्या सेनेला रसद मिळवून देण्याचं काम ही धनशक्ती करत होती. पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्य पैशांच्या बाबतीत समृद्ध बनला होता. कोणत्याही लढाई साठी कधीही आर्थिक चणचण भासू न देणारी सर्वात “स्ट्रॉंग सिस्टीम” होती मराठा साम्राज्यातील सावकारांची. थोरल्या शाहू महाराजांच्या काळात कर्ज देणाऱ्या सावकारांना विस्तारवादी धोरणांची जाणीव झाली. पेढी व्यवसायाला संस्थात्मक रूप आले. मराठ्यांच्या साम्राज्यात अनेक व्यापारी-सावकार प्रसिद्ध होते. त्यांमध्ये वैद्य, दीक्षित, पटवर्धन, भिडे, वानवले, कानडे, ब्रह्मेन्द्रस्वामी धावडशीकर, रास्ते, मोघे, गद्रे, अनगळ इ. मराठी सावकारांची नावे आपल्याला दिसून येतात. यात एक नाव प्रचंड फेमस होते. ते म्हणजे बारामतीकर बाबूजी नाईक. खुद्द बाजीराव पेशव्यांची बहीण त्यांच्या घरात दिली होती.
हे नाईक म्हणजे मूळचे कोकणातल्या केळशी गावचे जोशी. त्यांच्यापैकी केशव नाईक नावाचा एक पुरुष काशीस जाऊन सावकारी करू लागला. हा बहुधा छत्रपती शिवाजी महाराजांचा समकालीन असावा. केशव नाईकास सदाशिव, कृष्ण व अंतोबा असे तीन पुत्र होते. त्यापैकी कृष्णाजी नाईक शाहूबरोबर दक्षिणेंत आले. साता-यास येऊन राज्य मिळेपर्यंत शाहू महाराजांना निधी लागला तो नाईकांनी पुरविला, म्हणून शाहू छत्रपतींचा त्यांच्यावर लोभ जडून त्यांनी नाईकांना उदयास आणण्याची खटपट केली. या कुटुंबातील सदाशिव नाईक हे देखील सावकारीत हुशार म्हणून गणले जात असत. त्यांच्या पेढया सर्व मोठमोठया ठिकाणी देशभर होत्या. कृष्णाजी नाईकांना शनिवार पेठेची चौधरी अमलदारी होती. तर कृष्णाजींचा थोरला मुलगा विश्वनाथ साता-यास सावकारी करी आणि दुसरा मुलगा नारायणराव नागपूरच्या भोसल्यांकडे दिवाणगिरी करत असे. त्यांचा मात्र एका लढाईंत मृत्यू झाला. याच नारायणरावाचा मुलगा कृष्णराव उत्तरपेशवाईंत प्रसिध्द झाला. आजही साता-यास जो नाईकाचा वाडा आहे, तो या कृष्णरावांनी स. १६८५ त बांधला.
कृष्णराव नाईक हे पेशव्यांकडून टिप्पूजवळ वकील होते. पेशवाई बुडाल्यावर ते छत्रपतींच्या दरबारात खासगी कारभारी झाले. त्यांचा सन १८२५ च्या सुमारास मृत्यू झाला. आजही त्यांचे वंशज साता-यास राहतात. सदाशिव नाईक हे बारामतीकरांचे मूळपुरुष समजले जातात. ते व त्यांचे मुलगे सावकारीचा धंदा करीत असत. शाहू महाराजांच्या कळत नाईकांचा दबदबा इतका वाढला होता की पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी आपली मुलगी भिऊबाई त्यांच्या थोरल्या मुलाला दिली. या सोयरिकीमुळे नाईकांना पेशवाईचा विशेष पाठिंबा मिळून त्यांना राज्याची कामे करण्यास संधी मिळाली.
सदाशिवराव नाईक यांचे द्वितीय पुत्र म्हणजे बाबूजी नाईक होय. शाहू महाराजांच्या काळात कृपादृष्टी झाल्यामुळे बाबूजी नाईक यांना १७४३ साली बारामतीला जहागीर मिळाली आणि त्यांनी तेथे वाडा बांधून संपूर्ण नाईक कुटूंब बारामतीला राहू लागले. मधल्या काळात पेशव्यांशी त्यांचे वाद झाले होते पण पुढे १७५३ साली नाईकांनी पेशव्यांशी समेट केला. पानिपतातील मोठ्या पराभवानंतर मराठा साम्राज्याची घडी घालण्यास माधवराव पेशव्यांना त्यांनी मोठे साहाय्य केले. १७६२ साली बाबूजी नाईकांनी सरसेनापती धनाजी जाधव यांचे नातू, चंद्रसेन जाधवांचे पुत्र रामचंद्र माधव यांना निजामाकडून फोडून पेशव्याच्या बाजूस आणले. माधवरावांच्या मृत्यूसमयी बाबूजी नाईक त्यांच्याजवळ थेउरास होते. रघुनाथराव पेशव्यांची मुलगी दुर्गाबाई ही बाबूजी नाईकांचा मुलगा पांडुरंगराव यांना दिलेली होती.
पेशव्यांचे महत्वाचे सरदार परशुरामभाऊ पटवर्धन यांची मुलगी बाबूजी नाईकांच्या धाकट्या मुलास दिली होती. हा मुलगा लग्नाच्या पंधराव्या दिवशी वारला. याच विधवा मुलीसंबंधाने पुनर्विवाहाचा प्रश्न उपस्थित झाला होता. नारायणरावाच्या खुनानंतर बाबूजी नाईक हे आपले व्याही रघुनाथरावांच्या विरोधात गेले होते. भट घराण्यांत पेशवेगिरी गेल्यापासून सुमारे सत्तर वर्षे मराठेशाहीच्या कारभारांत वावरत असलेला असा बाबूजी नाईक हा एकच पुरुष दिसतो. ते रसिक व गुणज्ञ होते. कविवर्य मोरोपंत यांचा नावलौकिक होण्यास सावकार बाबूजी नाईकांचा आश्रय कारण झाला असं सांगितलं जातं.
कोकणातून आलेल्या मोरेश्वर पराडकर उर्फ मोरोपंत हे पुराणिक यांना बाबूजी नाईकांकडे राजाश्रय मिळाला होता. बारामतीतील कऱ्हा नदीकाठचा एक वाडा बाबुजी नाईकांनी मोरोपंतांना भेट दिला होता. या वाड्यातील एका खोलीत बसून मोरोपंतांनी आपल्या काव्यरचना निर्मिल्या. या खोलीच्या भिंतींवर यमक आणि अनुप्रास असलेले अगणित शब्द मोरोपंतांनी लिहून ठेवले होते. ते शब्द योग्य तेथे वापरून मोरोपंतांनी आपली काव्ये सजवत असत. पेशव्यांच्या खजिन्याचे मुख्य खांब म्हणून ओळखले जाणारे श्रीमंत बाबूजी नाईक स.१७८० च्या सुमारास वारले. त्यांचा मुलगा देखील फार काळ जगला नाही. त्यांच्या पश्चात या घराण्याची वाताहत झाली. मात्र बारामतीला पहिली ओळख बाबूजी नाईक यांच्यामुळेच मिळाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.