“सवाई सर्जाच चांगभलं” सोमवती अमावस्येनिमित्त श्री नाथांना नीरा स्नान
वीर : ढोल ताशांचा गजर, गुलालाची मुक्त उधळणम, भर उन्हात दर्शनासाठी भाविकांच्या लागलेल्या रांगा ” मंदिरात केलेली विविधरंगी फुलांची सजावट आणि मंत्रोपचार चा जप करीत, सवाई सर्जाच चांगभलं ” च्या जयघोषात श्री नाथांना नीरा स्नान घालण्यात आले. यावेळी भाविकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.
पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या क्षेत्र वीर येथे सोमवती अमावस्या उत्साहात पार पडली. यानिमित्त पहाटे चार वाजता श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्तींना महापूजा करून मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी सहा वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळी आठ वाजता देवस्थान ट्रस्ट व भाविकांच्या वतीने अभिषेक घालण्यात आले. तर सकाळी दहा वाजता भाविकांच्या वतीने दहिभात पूजा बांधण्यात आली. ११ वाजता वाजता धुपारती करून सर्व मानकरी, सालकरी, दागिनदार व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ढोल, ताशा, आणि सनई चौघडा या पारंपारिक वाद्यांच्या गजरात देवांची पालखी सर्व लवाजम्यासह नीरा नदी वरील श्री क्षेत्र घोडे उड्डाण येथे पोहोचली.
घोडे उड्डाण येथे पालखीचे आगमन होताच उत्सव मूर्तींची विधिवत महापूजा करून मूर्तींना शाही स्नान घालण्यात आले. याठिकाणी सामुहिक आरती झाल्यानंतर दुपारी दोन वाजता पालखी सर्व लवाजम्यासह मंदिरात परतली. दरम्यान देवाच्या दर्शनासाठी देऊळवाड्यात पहाटे पासून भाविकांनी रांगा लावल्या होत्या. देऊळ वाड्यातील दगडी कासवावर दिवसभर सालकरी गोसावी मंडळींचा गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता. दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांना बबन कुदळे, बाळासाहेब धुमाळ, किरण धुमाळ, आनंद धसाडे, सुभाष वाळके, शिवाजी गार्डी, शशिकांत चव्हाण यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी सांगितले.