मुळशीतील मानस तलावात तरंगत्या कारमध्ये आढळला मृतदेह; परिसरात खळबळ
मुळशी(प्रतिनिधी) : पौड (ता.मुळशी) पोलीस स्टेशन हद्दीत आज, सोमवार (दि. ८ जानेवारी) सकाळी ८:३० वाजता भुगाव हद्दीत हॉटेल सरोवराच्या समोरील मानस तलावामध्ये एक चारचाकीचा मागचा भाग तरंगताना दिसत असल्याची माहिती ११२ हेल्पलाईन नंबरला मिळाली. हि माहिती मिळताच पौड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज यादव यांच्या नेतृत्वाखाली पौड पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली.
त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन समिती प्रमोद बलकवडे यांच्या टीमने सदर गाडी बाहेर ओढली असता, ती गाडी (एम एच १४ सी वाय ००१०) स्कोडा चार चाकी गाडी असल्याचे समजले. त्यावेळी गाडीत मागील सीटवर एक व्यक्ती मृतावस्थेत तरंगत असल्याचे दिसून आले. व्यक्तीच्या बॅगेची तपासणी केली असता त्याचे नाव आधार कार्डवर रामदास हरिचंद्र पवार (वय ४० वर्ष रा. आंबेगाव बु. पुणे) असल्याचे दिसून आले. मृत व्यक्तीची ओळख पटवून मृतदेह शविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास पौड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पौड पोलीस करीत आहेत.