सुनेत्रा वहिनींना आम्ही बहुमताने निवडून आणू; विजय शिवातरेंचा यु-टर्न
सासवड : बारामती लोकसभा लढणारच, असा निर्धार केलेल्या विजय शिवतारेंनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अजित पवारांना आणि सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. जनता अजित पवारांना मतदान करणार नाहीत, त्यांचा उर्मटपणा गेला नाही, असं म्हणाऱ्या शिवतारेंनी अखेर आज यु-टर्न घेत सुनेत्रा वहिनींना आम्ही बहुमताने निवडून आणू, अशी घोषणा केली आहे.
शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी सासवडला आज शनिवारी(दि. ३० मार्च) पत्रकार परिषद घेऊन बारामतीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. तसेच निवडणूक न लढवण्याचा निर्णय का घेतला याची माहितीही त्यांनी दिली. मी ऐकत नसल्याने मुख्यमंत्री माझ्यावर रागावले होते. त्याचवेळी खतगावकर यांचा मला एक फोन आला. खतगावकर मला म्हणाले, बापू तुमच्यामुळे मुख्यमंत्र्यांना अडचण होत आहे. महायुतीला अडचण होतेय. सर्व ठिकाणी लोकांनी एकमेकांच्या विरोधात अपक्ष उमेदवार उभे केले तर महायुतीचा फायदा होणार नाही. तुमच्यामुळे कदाचित १०-२० खासदार पडतील. त्यामुळे आपल्याला आपल्या मुख्यमंत्र्यांना सांभाळायचं आहे. कोणत्याही स्थितीत शिवतारे ऐकत नाही असं वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना म्हटलं तर चालणार नाही. मुख्यमंत्र्यांची आणि महायुतीची अडचण होते. खतगावकर यांनी मला ही परिस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर मीही माघार घेण्याचा निर्णय घेतला, असं विजय शिवतारे म्हणाले.
पुढे बोलताना शिवतारे म्हणाले की, दादांच्या हातून काही चुका झाल्या असतील, काय झाले असले पण आज मोठं ध्येय साधण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. त्या भावनेतून ते सगळं बाजूला ठेवून हा उमेदवार निवडून आणून पंतप्रधान मोदींच्या हात बळकट करण्याचं काम करावं, असा ठराव आज आम्ही केला आणि सुरुवातीच्या काही लोकांच्या रिएक्शन्स होत्या पण जेव्हा हे सगळं ऐकलं त्याच्या नंतर सर्व लोकांनी एक मुखाने घोषणा दिल्या.
आधी अजित पवारांवर आरोप आता सुनेत्र पवारांना पाठिंबा!
बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार केलेल्या विजय शिवतारेंनी अजित पवारांवर अनेक आरोप केले होते. त्यांच्यावर टोलेबाजी केली होती. इंदापूरची जनता अजित पवारांना साथ देणार नाही. मी जनतेचा कौल घेतला तेव्हा जनता त्यांच्या विरोधात आहे. त्यांना मतं पडणार नाही, असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. त्यासोबतच बारामतीचा सातबारा पवारांकडे नाही आणि अजित पवारांचा उर्मटपणादेखील अजून गेलेला नाही. त्यामुळे जनता अजित पवारांच्या विरोधात आहे, असा हल्लाबोल अजित पवारांवर केला होता. त्यानंतर अजित पवारांची बारामतीत डोकेदुखी वाढली होती. त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीसाठी बोलून घेतलं आणि शिवतारेंची समजूत काढली. तरीही शिवतारे कोणतीही भूमिका स्पष्ट करत नव्हते. मुख्यमंत्र्याच्या ओएसडीच्या एका फोनमुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांना अडचण होऊ नये, म्हणून माघार घेतल्याचं ते म्हणाले. आता माघार घेतल्यानंतर त्यांनी लगेच सुनेत्र पवारांना विजयी करण्याच्या घोषणा दिल्या आहेत.