भोर तालुक्यातील “शिंद” गावात तमाशावरून “तमाशा”; परस्पर विरोधी तक्रारीत तब्बल १३ जणांवर गुन्हे दाखल
भोर : भोर तालुक्यातील शिंद गावात यात्रेनिमित्त ग्रामस्थांसाठी आयोजित केलेल्या तमाशाच्या कार्यक्रमावरून रविवारी(दि. १२ मे) राडा झाल्याचे पहायला मिळाले. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी वरून १३ जणांवर भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हरीदास शैलाजी खाटपे(वय ४५ वर्ष, रा. शिंद, ता. भोर) यांच्या तक्रारी वरून अविनाश विलास भालेघरे, सुरज संभाजी भालेघरे, अभिजित बाळु भालेघरे, सौरभ संभाजी भालेघरे, विश्वजित राजाराम पाटणे, स्वप्निल अंकुश पाटणे(वरील सर्व रा. शिंद ता. भोर) तसेच स्नेहा (पुर्ण नाव माहिती नाही, रा. गोगलवाडी शिवापुर ता. भोर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मनीषा ज्ञानोबा कुडले(वय ४२ वर्ष, रा. नाटंबी, ता. भोर) यांच्या तक्रारी वरून हरिदास शैलाजी खाटपे, सचिन शैलाजी खाटपे, कुणाल यशवंत खाटपे, प्रसाद संभाजी खाटपे, साहिल सुनील खटपे, संजय अनंता खाटपे(सर्व रा. शिंद, ता.भोर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हरीदास खाटपे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शिंद(ता. भोर) गावच्या वतीने यात्रनिमित्त ग्रामस्थांसाठी शनिवारी(दि. ११ मे) पहाटे ४ वाजता नाट्य तमाशा ठेवण्यात आलेला होता. या तमाशा मध्ये अविनाश भालेघरे, सुरज भालेघरे, अभिजित भालेघरे, सौरभ भालेघरे, विश्वजित पाटणे, स्वप्निल पाटणे हे आरडाओरडा करून गोंधळ घालून कार्यक्रमात व्यत्यय आणत होते. यानंतर फिर्यादी खाटपे हे त्यांना समजून सांगत असताना “तू आम्हाला सांगणार कोण आम्ही यात्रेची वर्गणी भरलेली आहे” असे म्हणून हाताने व लाथाबुक्याने मारहाण करू लागले त्यावेळेस यात्रा कमिटीतील सदस्यांनी व ग्रामस्थांनी हा वाद मिटवला. त्यांनतर फिर्यादी खाटपे हे दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी(दि. १३ मे) सकाळी १० वाजता रात्री झालेल्या प्रकाराबाबत विचारण्यासाठी गेले असता सौरभ भालेघरे यांनी त्याच्या हातातील दगड फिर्यादी यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर मारून दुखापत केली, तसेच पूजा सचिन खाटपे या भांडणे सोडवण्यासाठी मध्ये आले असता त्यांना सुद्धा स्नेहा(पूर्ण नाव माहित नाही रा. गोगलवाडी, ता. भोर) यांनी शिवीगाळ दमदाटी करून मारहाण केली असल्याचे हरीदास खाटपे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे.
तसेच फिर्यादी मनीषा ज्ञानोबा कुडले(वय ४२ वर्ष, रा. नाटंबी, ता. भोर) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी(दि. १२ मे) सकाळी ९:३० च्या सुमारास फिर्यादी व त्यांच्या घरातील लोक नाश्ता करीत असताना हरिदास खाटपे, सचिन खाटपे, कुणाल खाटपे, प्रसाद खाटपे, साहिल खाटपे, संजय खाटपे हे सर्वजण “अभ्या कुठे आहे?, तू बाहेर ये तुला रात्री तमाशा मध्ये लय माज आला होता का?” असे म्हणून शिवीगाळ करत घरामध्ये येऊ लागले फिर्यादी मनीषा कुडले या “तुम्ही घरामध्ये येऊ नका” असे म्हणून सर्वांना अडवू लागल्या असता त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करून हाताने मारहाण करून ढकलून देऊन खाली पाडले. तसेच सर्वजण घरात शिरून फिर्यादी यांचा भाचा अभय यास तेथे असलेल्या लोखंडी रॉडने डाव्या हाताच्या खांद्यावर मारहाण केली असल्याचे मनीषा कुडले यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. सदर घटनेचा पुढील तपास भोर पोलीस करीत आहेत.
सध्या जिल्ह्यात यात्रांचा हंगाम सुरू आहे. यात्रांमध्ये धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र, काही ठिकाणी श्रेयवादावरून, ऑर्केस्ट्रा, तमाशा सुरू असताना नाचल्यावर समजावण्यास गेल्यावर एकमेकांमध्ये वाद होत आहेत. त्याचे पर्यवसान हाणामारी करणे, गोंधळ घालणे, खून करण्यापर्यंत मजल जात आहे. त्यामुळे गावातील शांततेचा भंग होऊन गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. यामुळे पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशा प्रवृत्तींवर जरब बसवणे गरजेचे आहे.