धोम धरणाच्या कालव्यात बुडून पिता-पुत्राचा मृत्यू; वाई तालुक्यातील आंबेदरा-आसरे गावावर शोककळा

वाई : धोम धरणाच्या पाण्यात बुडून पिता पुत्राचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आंबेदरा-आसरे (ता. वाई) येथे आज दुपारी दोनच्या सुमारास घडली. उत्तम सहदेव ढवळे (वय ४५ वर्ष) व अभिजीत उत्तम ढवळे (वय १३ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे तालुक्याच्या पश्चिम भागावर शोककळा पसरली आहे.

याबाबत घटनास्थळी व वाई पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, धोम धरणाच्या जलाशयातून आसरे गावाजवळच्या बोगद्यातून बलकवडी धरणाचे पाणी कालव्याद्वारे भोर, खंडाळा व फलटण तालुक्याला नेण्यात आले आहे. सध्या कालवा बंद असल्याने याठिकाणी गेट टाकलेले आहे. या बोगद्या अलीकडे असलेल्या कालव्याच्या पाण्यात उत्तम ढवळे व अभिजीत ढवळे हे पितापुत्र दुपारी पोहण्यासाठी गेले होते. यावेळी कालव्यातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले. आजूबाजूच्या लोकांनी यावेळी आरडा ओरडा केला. यानंतर त्यांचा शोध घेतला मात्र ते मिळून आले नाहीत.

Advertisement

यानंतर पोलिस पाटील यांनी महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनीलबाबा भाटिया यांना सदरची माहिती दिली. त्यांनी प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम व वाई आपदा ट्रेकर्स यांच्या सदस्यांना कळविले. त्यांनी पाण्यात शोध मोहीम राबवली. ही शोध मोहीम तीन तास राबविण्यात आली. सायंकाळी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

यावेळी शोध मोहीमेतील सदस्य आशुतोष शिंदे (वाई) यांच्या डोक्याला बोगद्यातील लोखंडी बार लागल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावर वाई ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या शोध मोहिमेत सुनील भाटिया, अमित कोळी, सचिन डोईफोडे, सौरव साळेकर, सौरभ गोळे, महेश बिरामणे, अजित जाधव, आशिष बिरामणे, ऋषिकेश जाधव यांनी सहभाग घेतला.

सायंकाळी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी वाई येथे आणण्यात आले होते. या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे. उत्तम ढवळे हे शेतकरी असून त्यांचा चिकनचा व्यवसाय होता. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. उत्तम ढवळे हे पट्टीचे पोहणारे होते. त्यामुळे या दुर्देवी घटनेबद्दल तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page