ससेवाडी येथे ओढ्यातील अतिक्रमणावर अखेर हातोडा; महसुल विभागाची पोलीस बंदोबस्तात कारवाई

खेड शिवापूर : ससेवाडी(ता.भोर) येथे महामार्गालगत असणाऱ्या ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलुन त्या जागेवर सिमेंट काँक्रीट ने पक्के बांधकाम केलेल्या अतिक्रमणावर भोर महसुल विभाग, पोलिस प्रशासन व पीएमआरडीए यांनी एकत्रित कारवाई केली असुन या ठिकाणी केलेले पक्के बांधकाम तोडुन ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह पुर्ववत करण्याचे काम सुरू केले आहे.

ससेवाडी येथील डोंगरातुन पुणे सातारा महामार्गाकडे येणारया ओढ्या मध्ये  गट क्रमांक १०१ जमिनी मध्ये सन २०२२ पासुन अतिक्रमण होऊन ओढ्याचा मार्ग बदलुन कमी रुंदीचा करण्यात आला होता. याबाबत परिसरातील नागरीकांनी भोर तहसिलदार सचिन पाटील यांना तक्रारी केल्या होत्या. यावर तहसिलदार यांच्या सुचने नुसार ससेवाडी गावचे तलाठी यांनी जुन २०२२ मध्ये पाहणी करुन गट क्रमांक १०१ चे मालक लक्ष्मण कृष्णा शिंदे व इतर यांनी त्यांच्या जमिनी लगत असणारया नैसर्गिक ओढ्या मध्ये आर सी सी बांधकाम करुन ओढ्याचा नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण केला असुन अतिवृष्टी झाल्यास दुर्घटना होण्याची शक्यता असल्याचा अहवाल दिला होता.

त्यावर शेतकरी लक्ष्मण शिंदे यांनी गट क्रमांक १०१ या आमच्या मालकीच्या जागेतुन भावकीच्या जागेत जाण्यासाठी रस्ता तयार करत असल्याचे सांगुन नैसर्गिक प्रवाहास बाधा न आणता बांधकाम करत असुन यामुळे दुर्घटना घडल्यास जबाबदार राहु असा लेखी जबाब दिला होता.

यानंतरही या बाबत तक्रारी आल्या होत्या त्यानुसार जुन २०२३ मध्ये मंडलअधिकारी वेळु व तलाठी वेळु यांनी संयुक्त अहवाल सादर करुन सदर गट क्र.१०१ मध्ये ओढ्याचा प्रवाह अरुंद करत भिंतीचे बांधकाम चालु असुन ओढ्याचे पात्र लहान झाल्याने भविष्यात पाण्याचा प्रवाह राष्ट्रीय महामार्गावर येऊ शकतो व दुर्घटना होऊ शकते असा स्पष्ट अहवाल दिल्यावर तहसिलदार भोर यांनी ससेवाडी गट क्रमांक १०१ च्या लगत ओढ्याच्या नैसर्गिक प्रवाहामध्ये केलेले भिंतीचे काम स्वखर्चाने काढुन टाकुन नैसर्गिक प्रवाह पुर्ववत करण्याचे आदेश दिले होते.

Advertisement

तहसिलदार यांनी आदेश देऊनही या ओढ्यातील बांधकाम अतिक्रमण हटवण्यात आले नव्हते. या दरम्यान काही तक्रारदारांनी हरित लवादाकडे देखिल या बाबत तक्रार केली होती. हरित लवादाने या बाबत पुणे जिल्हाधिकारी यांना अहवाल पाठवण्यास सांगितल्यावर महसुल विभागाने यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेऊन अखेर बुधवारी(दि.3 एप्रिल २०२४) भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसिलदार सचिन पाटील यांनी स्वतःहा उपस्थित राहुन यंत्रणेसह अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. यावेळी मंडलाधिकारी प्रभावती कोरे, पीएमआरडीए चे राणा पाटील, महामार्ग प्राधिकरणाचे अभिजित गायकवाड, पोलिस फौजदार संजय सुतनासे, सार्वजनीक बांधकाम विभागाचे अधिकारी व तालुक्यातील सर्व मंडलाधिकारी, तलाठी उपस्थित होते.

जुलै २०२३ मध्येच या ओढ्यातील अतिक्रमण काढुन नैसर्गिक प्रवाह पुर्ववत करण्या बाबत निकाल दिला होता. त्या नंतर देखिल संबधीतांनी अतिक्रमण काढले नव्हते त्यांना नोटीस बजावल्या होत्या मात्र त्याला देखिल प्रतिसाद न दिल्याने बुधवारी(दि. ३ एप्रिल २०२४) रोजी महसुल विभागाने पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने कारवाई करत ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह पुर्ववत करण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्या ठिकाणी केलेल्या बांधकामा बाबत पीएमआरडीए ला मोजणी करुन बांधकाम काढुन टाकण्याच्या सुचना दिल्या आहेत.
          – सचिन पाटील, तहसीलदार, भोर तालुका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page