वसंत मोरे यांच्याकडून ससूनला उंदीर पकडण्याचा पिंजरा भेट; राजगड तालुक्यातील तरुणाचा उंदीर चावल्याने झाला होता मृत्यू

पुणे : पुण्यातील सर्वात मोठं शासकीय रुग्णालय असलेल्या ससूनमध्ये आयसीयूतील एका रुग्णाला उंदरानं चावा घेतल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार घडला होता. यापार्श्वभूमीवर ससून रुग्णालय प्रशासनाला अशा घटनांप्रती गांभीर्यानं पावलं उचलावीत यासाठी पुण्यातील वंचितचे लोकसभेचे उमेदवार वसंत मोरे यांनी अनोखी शक्कल लढवत थेट ससूनच्या डीनलाच उंदीर पकडण्याचा पिंजरा भेट दिला आहे.

या भेटीबाबत मोरे यांनी सोशल मीडियावरुन यामागची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटलं की, काल वंचित बहुजन आघाडी मधील माझा पहिलाच दिवस आणि आमच्या पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधून बातमी आली अपघातानं जखमी झालेल्या तरुणाचा ससून हॉस्पिटलच्या ICU विभागात ॲडमिट असताना उंदरानं चावा घेतल्यामुळं मृत्यू झाला. म्हणून ससून रुग्णालयाच्या विरोधात हॉस्पिटलच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन त्यांना उंदराचे पिंजरे आम्ही भेट दिले. जर जबाबदार लोकांवर कारवाई केली नाही आणि आरोग्याच्या बाबतीत निर्णय घेतले गेले नाहीत तर भविष्यात यापेक्षाही मोठाले पिंजरे आणण्याचा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना वंचित बहुजन आघाडीच्यावतीनं देण्यात आला.

Advertisement

दरम्यान, सागर रणुसे(वय ३० वर्ष, रा. मेरावने, पोस्ट. गुंजवणे, ता. राजगड) असे ससूनमध्ये उंदीर चावल्यानं मृत्यू झालेल्या रुग्णाचं नाव आहे. १५ तारखेला दुचाकी चालवत असताना सागरचा अपघात झाला होता. त्यानंतर १७ मार्च रोजी त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरूच होते.

दरम्यान, २५ तारखेला त्याच्यावर एक शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर सागरला आयसीयूत दाखल करण्यात आलं. मात्र, त्याची प्रकृती ढासळत गेली आणि त्याचा मृत्यू झाला. पण सागरच्या नातेवाईकांनी आरोप केला की आयसीयूमध्ये सागरला उंदरानं विविध ठिकाणी चावा घेतला आहे, त्यातच त्याचा मृत्यू झाला. मात्र, नातेवाईकांनी केलेल्या आरोपा प्रमाणे रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे ससून रुग्णालय प्रशासनानं म्हटलं आहे. परंतु आयसीयूमध्ये उंदीर सापडणे ही अतिशय दुर्दैवी घटना असून रुग्णालयाच्या स्वच्छता विभागाचा निषेध करत ससून रुग्णालयाच्या डीन ला वसंत मोरे यांनी उंदीर पकडण्याचा पिंजरा भेट दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page