माघार न घेण्यासाठी आलेले फोन विजय शिवतारेंनी मला दाखवले; बारामतीत गौप्यस्फोट करताना अजित पवार भावूक
बारामती : शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या उमेदवारीबद्दल बारामतीतील कार्यकर्ता मेळाव्यात खळबळजनक गौप्यस्फोट करत अजित पवार म्हणाले की, “पुरंदरमध्ये विजय शिवतारे आता आपल्यासोबत आहेत. ते ११ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझी सभा घेत आहेत. उमेदवारी मागे घेऊ नये म्हणून शिवतारे यांना आलेले फोन त्यांनी मला दाखवले,” असा दावा अजित पवारांनी केला. तसेच यावेळी ते भावुक होत म्हणाले की, “ते फोन नंबर बघून मला इतकं वाईट वाटलं की कोणत्या पातळीवर राजकारण सुरू आहे. त्यांनी ते फोन नंबर मला, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनाही दाखवले. मी ज्यांच्यासाठी जीवाचं रान केलं, बाकी काही बघितलं नाही, त्यांच्याकडून माझ्या बाबतीत असं राजकारण सुरू आहे,” असा हल्लाबोल अजित पवारांनी यावेळी केला.
अजित पवार यांनी आजच्या आपल्या भाषणात पुरंदरचे माजी आमदार दादा जाधवराव यांच्यासोबत झालेल्या भेटीचा दाखला देत शरद पवारांवर निशाणा साधला. “मी दादा जाधवराव यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना भेटलो. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी पवारसाहेबांना देव मानत होतो. मात्र त्यांनी एका निवडणुकीत हा बैल म्हातारा झाला आहे, आता याला बाजार दाखवा, असं म्हणत माझ्याविरोधात प्रचार केला. त्या निवडणुकीत माझा पराभव झाला. ज्या व्यक्तीला मी देव मानत होतो त्यांनी माझी तुलना बैलाशी केली. आता सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मी तालुक्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे, असा शब्द मला दादा जाधवरावांनी दिला,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आजच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचाही जोरदार समाचार घेतला. त्यामुळे आगामी काळात या मतदारसंघातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.