सिंहगड पायथ्याशी मोठ्या प्रमाणात मद्य व गुटख्याचा साठा जप्त; उपद्रवी पर्यटकांवर दंडात्मक कारवाई
पुणे : सिंहगडाच्या पायथ्याशी गोळेवाडी येथील वन विभागाच्या तपासणी नाक्यावर वन विभाग व राजे शिवराय प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संयुक्तपणे राबविण्यात आलेल्या ‘सिंहगड रक्षण मोहिमेतून’ पर्यटकांच्या वाहनांची तपासणी करत मोठ्या प्रमाणात मद्य, गुटखा व सिगारेटची पाकिटे जप्त करुन नष्ट करण्यात आली.
ज्या उपद्रवी पर्यटकांकडे मद्याच्या बाटल्या आढळून आल्या त्यांच्यावर वन विभागाकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. तपासणी सुरू असलेली पाहून कारवाईच्या भीतीने अनेक पर्यटक माघारी फिरताना दिसत होते. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक पर्यटक सिंहगडावर येतात. गडावर जाताना मद्य, गुटखा, सिगारेट किंवा इतर नशेचे पदार्थ सोबत घेऊन जाण्यास वन विभागाने बंदी घातलेली आहे. तसेच याबाबत विविध सामाजिक संस्था व वन विभागाच्या वतीने सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. असे असताना अनेक उपद्रवी पर्यटक गडावर जाऊन मद्यप्राशन करतात व गडाचे पावित्र्य भंग करतात.
यावर्षी सकाळपासून राजे शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पवळे व अध्यक्ष शिवाजी खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सिध्देश काप, प्रशांत हरेकर, हर्षल तापकीर, रुपेश सपकाळ, प्रमोद जोरी, नकुल थावरे, मयुर शेडगे, अजय सावंत, तुषार शिंदे, सागर कांबळे, हर्षद खरात, सागर काळोखे, सागर कदम, प्रियेश तिखे , शुभम चांदेरे, अजिंक्य सुतार , प्रशांत बालवडकर , अजय निम्हण , गणेश निम्हण , संतोष गटकल आदींनी वनपाल समाधान पाटील , वनरक्षक बळीराम वायकर, वन व्यवस्थापन समितीचे कर्मचारी यांच्यासह गडावर जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली व मोठ्या प्रमाणात मद्य, गुटखा व सिगारेटची पाकिटे जप्त करुन नष्ट केली.