निवडणुकीच्या काळात किती रोख रक्कम जवळ ठेवता येते? निवडणूक आयोगाची काय आहे मर्यादा? वाचा सविस्तर
निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. काही ठिकाणचे सोडले तर जवळपास सर्व ठिकाणचे उमेदवार देखील निश्चित झाले आहे.
दरम्यान या निवडणुकीच्या काळात सर्वानांच एक प्रश्न पडला असेल, तो म्हणजे या काळात आपण सोबत किती रोख रक्कम ठेऊ शकतो. निवडणुकीत पैशांचा गैरवापर होऊ नये म्हणून निवडणूक आयोगानं सोबत पैसे ठेवण्याची मर्यादा निश्चित केली आहे. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
निवडणुकांच्या काळात पैशांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर
निवडणूक लोकसभेची असो किंवा विधानसभेची असो यामध्ये पैशांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झालेला दिसतो. तसेच या काळात जास्त रक्कम ठेवल्याबद्दल कारवाई देखील होते. या काळात पैशांचा गैरवापर होऊ नये म्हणून निवडणूक आयोग काही मर्यादा घालून देते. या मर्यादे प्रमाणे तुम्हाला रोख रक्कम जवळ बाळगावी लागते, अन्यथा तुमच्यावर कारवाई होण्याची शक्यता असते.
५० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम असल्यास कागदपत्रे दाखवावी लागणार
सध्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरु झाला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसहिंता राज्यात लागू करण्यात आली आहे. आचारसहिंताचे नियम केवळ उमेदवारांसाठीच नाहीतर राज्यातील सामान्य जनतेसाठी देखील आहेत. यामध्ये तुम्ही जवळ किती रोख रक्कम ठेऊ शकता किंवा किती रुपयांचे दागिणे सोबत ठेऊ शकता यावर मर्यादा घालण्यात आली आहे. निवडणूक आोगाच्या नियमानुसार तुम्ही ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम किंवा १० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या भेटवस्तू असल्यास, तुम्हाला कागदपत्रे दाखवावी लागतील. अन्यथा तुमची रक्कम जप्त केली जाईल.
जप्त केलेली रक्कम परत मिळू शकते का?
दरम्यान, एखादा व्यवसाय करणारी व्यक्ती स्वत:जवळ जास्त रक्कम ठेऊ शकते. मात्र, त्या व्यक्तिला व्यवसायासंदर्भात पूर्ण माहिती देणं गरजेचं आहे. तुमच्या संपूर्ण व्यवहाराची नोंद असणं गरजेचं आहे. जेणेकरुन तुमची चौकशी केली तरी तुम्हाला योग्य माहिती देता येईल. दरम्यान, तपासादरम्यान, तुमच्याकडे जर मर्यादेपेक्षा अधिक रक्कम मिळाली तर तुमची रक्कम जप्त होते. मात्र, ही रक्कम तुम्हाला परत मिळते का? असा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल. तर याचे उत्तर होय असे आहे. कारण तुम्ही जर योग्य ती कागदपत्रे सादर केली तर तुमची रोख रक्कम परत मिळू शकते.