भोरच्या रायरी गावातील फलकाची सगळीकडे चर्चा
भोर : सध्या भोर तालुक्यात रायरी या गावामध्ये लावलेल्या फलकाची सर्वत्र चर्चा पहायला मिळत आहे. “रायरी गावामध्ये बाहेरील पार्टीवाल्यांना जमीन खरेदी-विक्री व्यवहारास बंदी व गावबंदी”, असा या फलकामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. भोरपासून २५ किमी अंतरावर असणाऱ्या तसेच रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी व निरा देवघर धरणाच्या बाजूच्या या गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे.
हा निर्णय ग्रामस्थांना व ग्रामपंचायतीला का घ्यावा लागला, यामागे कारणही तसेच आहे. या भागात असणारे निरा देवघर धरण होण्यापूर्वी या भागातील कोणीही जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करीत नव्हते. परंतु धरण झाल्यानंतर अनेक जण जमिनी घेण्यासाठी या भागात येऊ लागले. काही लोक स्थानिक एजंट, शेतकऱ्यांना हाताशी धरून कवडीमोल भावाने जमीन खरेदी करून थोडी विकसित करून चढ्या भावाने पुन्हा विक्री करीत असल्याचे चित्र या भागात दिसत आहे. यामध्ये काही शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचेही पहायला मिळत आहे. निरादेवघर धरण उशाला असूनही स्थानिक काही शेतकऱ्यांकडे जमिनी शिल्लक राहिल्या नाहीत.
तसेच धरणामुळे विस्थापित झालेले काही शेतकरी उर्वरित राहिलेली डोंगर माथ्याची जमीन दलालांच्या मध्यस्थीने विकत आहेत. त्यामुळे गावातील ७० टक्के जमीन विक्री झाल्याचे धक्कादायक प्रकरण ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यामुळे कमीत कमी यापुढे तरी गावातील जमीन खरेदी-विक्री होऊ नये यासाठी रायरी ग्रामस्थांनी हा निर्धार केला असून तसे फलक गावात जागोजागी लावण्यात आले आहेत. त्यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.