गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूसासह २ संशयित ताब्यात; शिरवळ पोलिसांची कारवाई
शिरवळ : शिरवळ पोलीसांनी पेट्रोलिंगदरम्यान दोन संशयित व्यक्तींकडून गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त केले आहे. दिपक संतोष पाटणे (वय २२ वर्षे, रा. विंग, ता. खंडाळा) आणि ओम सतिष कदम (वय १९ वर्षे, रा. लोणी, ता. खंडाळा) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरवळ पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, शिरवळ(ता. खंडाळा) हददीतील पळशी रोडवर दोन संशयित इसम धनलक्ष्मी रेसिडेंटच्या पार्किंग आवारात संशयस्पदरीत्या फिरत आहेत.
पोलीसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यामध्ये त्यांच्याकडून एक लोखंडी स्टीलचे गावठी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतूस आणि एक मोटारसायकल असा एकूण सुमारे १ लाख २० हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानुसार दिपक संतोष पाटणे (वय २२ वर्षे, रा. विंग, ता. खंडाळा, जि. सातारा) आणि ओम सतिष कदम (वय १९ वर्षे, रा. लोणी ता. खंडाळा, जि. सातारा) यांच्या विरोधात शिरवळ पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम नुसार गुन्हा नोंदवला आहे.
सदरची कारवाई ही शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, शंकर पांगारे, सहा. पोलीस फौजदार पवार, पो.हवा. सचिन वीर, जितेन्द्र शिंदे, प्रशांत धुमाळ, पो.कॉ. मंगेश मोझर आणि सुरज चव्हाण यांच्या टीमने केली.