गद्दारीचा शिक्का लावून कुलदीप कोंडे शिवसेना एकनाथ शिंदे गटात गेले; माऊली शिंदे यांची पत्रकार परिषदेत जहरी टीका
नसरापूर : भोर तालुक्यातील उ.बा.ठा. शिवसेना पक्षाचे माजी जिल्हा संघटक कुलदीप कोंडे यांनी शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केला असला तरी मूळ उ.बा.ठा. गटाचे शिवसैनिक जागेवरच असून पक्ष सोडणाऱ्यांवरती गद्दारीचा शिक्का लागला आहे, कोणत्या तोंडाने ते मतदारांकडे मत मागायला जाणार अशी घणाघाती टीका उ.बा.ठा. शिवसेना भोर तालुका प्रमुख माऊली शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. हॉटेल चिंतामणी(केळवडे, ता.भोर) येथे आज रविवारी(दि. २१ एप्रिल) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, कुलदीप कोंडे यांच्या पक्षप्रवेशाने भोर-वेल्हा तालुक्यात काहीही फरक पडणार नसून एकही पदाधिकारी त्यांच्या बाजूने गेलेला नाही. तसेच त्यांनी पक्ष प्रवेशाबाबत कोणतीही कल्पना न देता शिवसेना(एकनाथ शिंदे गट) मध्ये अचानक प्रवेश करून शिवसैनिकांना धक्का दिला असल्याचे शिंदे बोलले. तसेच मातोश्री वरून येणारा आदेश पाळणारा भोर तालुक्यातील शिवसैनिक असून महाविकास आघाडीचे काम करण्याचे आदेश आम्हाला मातोश्रीवरून आले आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळेंना जवळपास ५० हजारचे लीड आघाडी देणार असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, २०१७ साली वेळू-भोंगवली गण अस्तित्वात आला. तेव्हा माझी बायको भाग्यश्री शिंदे या जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या. परंतु कुलदीप कोंडे यांनी पुन्हा मला त्या ठिकाणी सांगितलं की, पुढच्या वेळेस तुम्हाला संधी देऊ, परंतु आता परत पुन्हा आम्हाला उमेदवारी द्या. मी सुद्धा हरकत नाही म्हणलं आणि मग त्या ठिकाणी त्यांच्या पत्नी शलाका कोंडे यांना उमेदवारी दिली आणि जोमाने काम करून त्यांना निवडून आणले. त्यांना निवडून आणणारा शिवसैनिक उ.बा.ठा शिवसेना गटासोबत म्हणजे आमच्या सोबत आहे. तो कुठेही गेलेला नाही. त्यामुळे आमची भोर तालुक्यातील ताकद आहे तेवढीच आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करून सुरुवातीपासूनच आम्ही महाविकास आघाडीचे काम करीत आहोत आणि यापुढेही कडवा शिवसैनिक सुप्रिया सुळे यांच्या बरोबरच राहणार आहे. कोन शिवसेना सोडुन गेला त्याचा काही परिणाम शिवसेनेवर झालेला नाही. मुळ शिवसैनिक आणि पदाधिकारी आपल्या जागेवरच आहे, असा विश्वास यावेळी उ.बा.ठा शिवसेना गटाचे तालुकाध्यक्ष माऊली शिंदे यांनी व्यक्त केला.
तसेच कुलदीप कोंडे यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशाने राजगड तालुक्यातील कोणताही पदाधिकारी, शिवसैनिक पक्ष सोडून गेलेला नसून जागेवरच आहे, तसेच राजगड तालुक्यातून सुप्रिया सुळेंना चांगले मताधिक्य देऊ असे राजगड तालुका प्रमुख दीपक दामगुडे यांनी यावेळी सांगितले. कुलदीप कोंडे यांना त्यांच्या नावामुळे नाही तर शिवसेना संघटनेतून मोठ्या प्रमाणात मतदान झाले असून भोर तालुक्यातील शिवसैनिक हे लोकसभेला मतदानातून दाखवून देणार असल्याचे युवासेना तालुका प्रमुख अनिकेत शिंदे यांनी या वेळी सांगितले. या पत्रकार परिषदेस भोर तालुका प्रमुख माऊली शिंदे, राजगड तालुका प्रमुख दीपक दामगुडे, युवासेना प्रमुख अनिकेत शिंदे, दत्तात्रय जाधव, दशरथ गोळे, निशाताई सपकाळ तसेच आदी शिवसैनिक उपस्थित होते.