वीर कोयाजीराव बांदल यांच्या शौर्य दिनानिमित्त मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते तैल चित्राचे अनावरण
आळंदे(ता. भोर) येथील नेकलेस पॉइंट जवळ वीर कोयाजीराव बांदल प्रतिष्ठान हिरडस मावळ यांच्यावतीने वीर कोयाजीराव बांदल यांच्या शौर्य दिनानिमित्त त्यांच्या तैल चित्राचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते रविवारी(दि. २१ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता करण्यात आले. यावेळी बांदल, गोळे, गाडे, शिळीमकर, मोहिते, देशमुख, कंक, जेधे अशा सरदार घरातील लोक उपस्थित होते.
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की,
वीर कोयाजीराव बांदल यांचे शौर्य, त्यांचा इतिहास, त्यांचा पराक्रम हा आपण राज्य पातळीवर, देशपातळीवर कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न करू. काही लोकांचा इतिहास जाणून-बुजून अंधारात ठेवला गेला. बाहेर येऊ दिला नाही. त्याचा शोध घेऊन त्याला प्रकाश झोतात आणण्याचे काम आपले आहे. तसेच मराठा आरक्षण संदर्भात मराठा समाजाकडून दाखला काढण्या संदर्भातच्या अटी व शर्ती कमी झाल्या पाहिजेत. वंशावळी संदर्भात निर्णय दोन दिवसात होईल त्याबाबत मी मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, काहीजण समाधीस्थळाकडे येताना मला बोलले की, तुम्हाला लाखोंची गर्दी बघण्याची सवय लागली आहे. परंतु असे काही नाही. मी गर्दीतला माणूस नाही, मी साधा माणूस आहे. फक्त मला गोरगरिबांची, माझ्या समाजाची जाण आहे त्यांच्यावर होणारा अन्याय व अत्याचार मी सहन करू शकत नाही. आतापर्यंत मराठा समाजाने खूप अन्याय सहन केलेला आहे. त्यामुळे मी इतक्या ताकतीने पेटून उठलो आहे. मी मरायला घाबरत नाही. माझ्यापुढे किती मोठी सत्ता आहे. किंवा सरकार आहे त्यांना मी अजिबात घाबरत नाही. कारण शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे रक्त आपल्या अंगात आहे. त्यामुळे आपल्याला घाबरण्याचे काहीही कारण नाही. मी ज्या रस्त्याने जाणार आहे त्या रस्त्यात माझ्यासाठी १० लोक जरी उभे राहिले असतील तरी मी त्यांना भेटूनच पुढे जातो.
आचारसंहिता लागू असल्यामुळे सरकारला १ महिना सुख
त्यानंतर जरांगे पाटील म्हणाले की, मराठा-कुणबी-शेतकरी हे एकच आहेत कारण कुणबी याचा अर्थ शेती करणे होते. त्याच्यामुळे कुणबी हा मराठा समाज आहे. त्यामुळे तो आर्थिक मागास वर्गामध्ये मोडतो. कुणबी हा पूर्वी अडाणी माणसाचा शब्द होता. त्याचा सुधारित शब्द शेती हा झाला आहे. मराठा समाज हा शेती करत होता आणि लढाई करत होता त्याच्यामुळे मराठा समाज हा कुणबी समाजाच आहे. सध्या आचारसंहिता लागू आहे त्यामुळे सरकारला १ महिना सुख आहे. सगळ्या मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही.
९० गावांचा रेकॉर्ड जळालेल्या संदर्भात काय करायचे ते सांगतो
भोर तालुक्यातील ९० गावांचा रेकॉर्ड जळलेला आहे. त्या संदर्भात तुम्ही जळीताचा पंचनामा पहिला शोधा तो आहे का नाही याचा पहिला शोध घ्या. पहिल्या काळात काही जळाले त्याचे पंचनामे होत असायचे त्यामुळे तुम्ही शासनाकडे पंचनामे तपासा मग तुम्हाला सत्य परिस्थिती कळेल. त्यानंतर मग पुढे काय करायचे ते मी सांगतो.
आरक्षणाचा फायदा घेत ११ मुले पोलीस उपनिरीक्षक तर २ कलेक्टर झाले
काही अधिकारी जातिवाद करतात त्यांना मराठा समाजाला मोठे होऊ द्यायचं नाही. त्यांना शिकून द्यायचं नाही. आपल्याला आरक्षण त्यांना द्यायचं नाही. त्यांना आपल्याला मोठे होऊन द्यायचे नव्हते. या आठवड्यात MPSC परीक्षा देऊन ११ मुले पोलीस उपनिरीक्षक झाली. त्यांना मराठा आरक्षणाचा फायदा झाला. तसेच दोन कलेक्टरही झाले आहेत. आपल्याला आरक्षण मिळाल्यानंतर एका वर्षात तुम्हाला जाणवेल की मराठा समाजाचे अधिकारी तुम्हाला जागोजागी दिसतील. हा माझा शब्द आहे. असे जरांगे पाटील म्हणाले.
काही पक्षाकडून मला खासदारकीच्या ऑफर आल्या
मला सरकार मधला एक मंत्री म्हणाला की तुमची चर्चा झाल्याशिवाय मंत्रिमंडळाचा दिवस जात नाही. मराठा समाजाने मला आता लेकरू मानलेले आहे. त्या माय बापाशी गद्दारी करणारी आपली अवलाद नाही. मी खासदार झालो असतो तशा पक्षाकडून मला ऑफर येत होत्या. मला गाडी, विमान, घर फ्री मध्ये मिळाले असते. तसेच पगार घेतला असता पेन्शन घेतली असती, निवांत राहिलो असतो पण मी तसा कार्यकर्ता नाही. मी रात्रंदिवस समाजाचं काम करतो दुसरं काही कामच करत नाही. असे ते यावेळी बोलले.
सापसुरळी वरून छगन भुजबळांना टोला
पुढे भाषण करत असताना मनोज जरांगे पाटील यांच्या पायाखालून साप सुरळी गेली. त्यावेळेस ते म्हणाले की, सापसुरळी येवल्यावरून आली आहे का त्याचा तपास करावा. ते नाशिकचं स्वतःलाच मोठे समजायचं, ते आता कुठे गेले काय कळना, या सर्वांना मी तुमच्या ताकदीवर नीट केले आहे यापूर्वी आपला मराठा समाज हा एकजूट, एकत्र नव्हता आता आपण एकत्र आलो आहोत.
८ जूनला नारायण गडावर उपस्थित राहण्याचे केले आवाहन
६ कोटी मराठ्यांचा नारायण गडावर(जि. बीड) ८ जूनला भव्य कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी बहुसंख्य मराठी बांधव येणार आहेत. त्यावेळी आपली शक्ती आपल्याला दाखवायची आहे. एकही मावळा किंवा मराठा माणूस यावेळी घरी राहायला नाही पाहिजे. आपली एकजूट दाखवण्याची ती वेळ आली आहे. यामुळे सर्वांनी नारायण गडावर उपस्थित राहण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सर्वांना केले.