त्यांना संसदरत्न मिळाला, भोर तालुक्याला काय मिळाले? जय अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका
भोर : बारामती लोकसभा मतदार संघामध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. दोन्ही उमेदवारांकडून प्रत्येक गावागावात जोरदार प्रचार चालू आहे. आरोपप्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. पण हे आरोपप्रत्यारोप एकाच कुटुंबात होताना दिसत आहे. आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संसदरत्न पुरस्कारावरून शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. आता अजित पवार यांचे दुसरे चिरंजीव जय पवार यांनीच आपल्या आत्याच्या संसदरत्न पुरस्कारावरून सवाल केला आहे.
जय पवार हे आज सोमवारी(दि. २२ एप्रिल) भोर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील भाबवडी, खानापूर, पोळवाडी, जेधेवाडी, बालवडी, वरवडी बु।।, वरवडी डाय, वरवडी खु।।, पळसोशी, धावडी, बाजारवाडी, मानकरवाडी यागावांचा गावभेट दौरा पार्थ पवार व महायुतीच्या भोर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुरू असताना जय पवार यांनी पहिल्यांदाच सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला, त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला, भोर तालुक्याला काय मिळालं? असा सवालच जय पवार यांनी यावेळी केला. संसदरत्न पुरस्कार हा सरकारचा नाहीये, हा एका एनजीओ मार्फत दिला जातो. त्यामुळे तो असं काही मोठा पुरस्कार नाही, असा हल्लाच जय यांनी चढवला. अनेक वर्ष तुम्ही सुप्रियाताईंना संधी दिली होती. त्यांना खासदार बनवलं, पण जशी कामे व्हायला पाहिजे होती तशी काहीच कामे झालेली दिसली नाहीत, अशी टीकाच जय पवार यांनी सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता केली.
या प्रचारादरम्यान महायुतीचे कुलदीप कोंडे, रणजीत शिवतरे, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, संतोष घोरपडे, अमर बुदगुडे, समीर घोडेकर, संपत तनपुरे यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.