राज ठाकरेंच्या आदेशा विरुद्ध काम करणाऱ्या मनसे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांची हकालपट्टी होणार?; दुसरे मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र गारुडकरांनी केले पत्रक जाहीर
भोर : सध्या देशात चर्चा असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सध्या महायुती व महाविकास आघाडी यांचा प्रचार दौरा जोरात सुरू असलेला पहायला मिळत आहे. या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशातील नेतृत्व मान्य करत संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. मनसैनिकांसाठी राज ठाकरेंचा आदेश म्हणजे उच्चस्थानी असतो. यामुळे राज्यभरात सर्व मनसैनिक महायुतीच्या प्रचारात सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
परंतु बारामती लोकसभा मतदार संघात मनसे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांनी मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केल्याचा आरोप दुसरे मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र गारुडकर यांनी केला आहे. त्यांनी तसे पत्रक जाहीर केले आहे. सध्या सोशल मीडियावर संतोष दसवडकर व त्यांच्या कार्यकर्त्यांचा आमदार रोहित पवारांबरोबर असलेला फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावरूनच दसवडकर यांनी रोहित पवार यांची भेट घेऊन सुप्रिया सुळेंना पाठिंबा जाहीर केला असल्याचा आरोप गारुडकर यांनी केला आहे.
ॲड. रवींद्र गारुडकर यांनी जाहीर केलेल्या पत्रकात काय म्हंटले आहे?
राज साहेब ठाकरे यांनी देशाच्या उज्वल भविष्याकरिता लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी व महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राजसाहेबांचा आदेश झुगारुन मनसे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची भेट घेऊन सुप्रिया ताईंना बारामती लोकसभेसाठी पाठींबा दिला असल्याचे दिसत आहे. राजसाहेबांचा आदेश डावलून अशा प्रकारची “गद्दारी” पक्ष सहन करणार नाही. संबंधितांवर हकालपट्टीची त्वरित कारवाई होणार हे निश्चित आहे. तरी सर्व निष्ठावान मनसे सैनिकांनी बारामती लोकसभेच्या उमेदवार “सुनेत्रावहिनी अजिततदादा पवार” यांच्या प्रचारात मोठ्या संख्येने सहभागी होवून त्यांना प्रचंड बहूमताने निवडून आणून पक्षात “गद्दारी” करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्यावे. अशा आशयाचे पत्रक त्यांनी जाहीर केले आहे.
मनसे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यावर काय प्रतिक्रिया देणार?
मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र गारुडकर यांनी केलेल्या आरोपावर संतोष दसवडकर काय उत्तर देणार? त्यांनी खरंच सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिला आहे का? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश झुगारून त्यांनी खरंच गद्दारी केली आहे का? यावर संतोष दसवडकर काय प्रतिक्रिया देणार याकडे मात्र सर्व मनसैनिकांचे लक्ष लागले आहे.