निवडणुकीत बोटावर लावण्यात येणारी शाईचा काय आहे इतिहास? कुठे तयार होते? दीर्घकाळ न पुसण्याचं रहस्य काय?
निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : तुम्ही मतदान करत असाल तर तुमच्या बोटांवर निळी शाई लावली जाते. बोटावरील ही निळी शाईची खूण आता आपल्या निवडणूक चिन्हांमध्ये गणली जाते. हे चिन्ह कोणी मतदान केले किंवा नाही हे सांगते. ही खूण १५ दिवसांपर्यंत तरी पुसली जात नाही. कारण, कुठल्याही मतदाराला दुसऱ्यांदा मतदान करता येऊ नये म्हणून. पण, ही शाई कुठं बनवली जाते? या शाईमध्ये काय आहे? आणि त्याचा इतिहास काय आहे? माहिती घेऊयात.
ही शाई कर्नाटकातील म्हैसूर येथील म्हैसूर पेंटस् अॅण्ड वॉर्निश लि. कंपनीमध्ये तयार केली जाते. या ठिकाणी पूर्वी वाडियार घराण्याची सत्ता होती. स्वातंत्र्यापूर्वी त्याचे शासक महाराजा कृष्णराज वाडियार होते. वाडियार घराणे जगातील सर्वात श्रीमंत राजघराण्यापैकी एक होते. या राजघराण्याची स्वतःची सोन्याची खाण होती. १९३७ मध्ये कृष्णराज वाडियार यांनी म्हैसूर लेक आणि पेंट्स नावाचा कारखाना काढला. या कारखान्यात रंग आणि वार्निश बनवण्याचे काम केले जात होते.
म्हैसूर पेंट अँड वार्निश लिमिटेड शाई निर्माण करणारी देशातील एकमेव कंपनी
भारताच्या स्वातंत्र्यानंतर या कारखान्यावर कर्नाटक सरकारचा अधिकार आला. सध्या या कारखान्यात कर्नाटक सरकारचा ९१ टक्के हिस्सा आहे. १९८९ मध्ये या कारखान्याचे नाव बदलून म्हैसूर पेंट अँड वार्निश लिमिटेड असे करण्यात आले. देशात ही एकमेव कंपनी असून या कंपनीला शाई निर्माण करण्याचा आणि ती विकण्याचा अधिकार आहे.
दोनदा मतदान केल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे वाढू लागल्दायाने पुसली न जाणारी शाई वापरण्याची पद्धत सुरू
भारतातील पहिल्या निवडणुका १९५१-५२ मध्ये झाल्या. या निवडणुकांमध्ये मतदारांच्या बोटावर शाई लावण्याचा नियम नव्हता. दुसर्याला मत दिल्याच्या आणि दोनदा मतदान केल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे येत होत्या. या तक्रारींनंतर निवडणूक आयोगाने ते थांबवण्यासाठी अनेक पर्यायांचा विचार केला. यात पुसली न जाणारी शाई वापरणे ही सर्वोत्तम पद्धत होती.
१९६२ मध्ये झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदा ही शाई वापरण्यात आली
निवडणूक आयोगाने अशी शाई बनवण्याबाबत नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडियाशी (NPL) चर्चा केली. NPL ने अशी शाई शोधून काढली जी पाण्याने किंवा कोणत्याही रसायनाने पुसली जाऊ शकत नाही. एनपीएलने म्हैसूर पेंट आणि वार्निश कंपनीला ही शाई तयार करण्याचे आदेश दिले. १९६२ मध्ये झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदा ही शाई वापरण्यात आली होती. तेव्हापासून प्रत्येक निवडणुकीत हीच शाई वापरली जाते.
या कंपनीने शाई बनवण्याची पद्धत कधीच सार्वजनिक का केली नाही?
NPL किंवा म्हैसूर पेंट अँड वार्निश लिमिटेडने ही शाई बनवण्याची पद्धत कधीच सार्वजनिक केली नाही. याचे कारण असे सांगण्यात आले की, हा गुप्त फॉर्म्युला सार्वजनिक केला तर लोकांना तो पुसून टाकण्याचा मार्ग सापडेल आणि त्याचा हेतूच नष्ट होईल. तज्ज्ञांच्या मते, या शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट मिसळले जाते, ज्यामुळे ही शाई प्रकाशसंवेदनशील स्वरूपाची बनते. यामुळे सूर्याच्या संपर्कात येताच ती अधिक घट्ट होते. ही शाई बोटावर लावताच १५-४० सेकंदामध्ये तिचा ओलसरपणा नष्ट करते त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी ती पुसली जात नाही.