पोलीस चौकीत घुसून पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल; खेड-शिवापूर पोलीस चौकीतील प्रकार
खेड-शिवापूर : राजगड पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या खेड-शिवापूर पोलिस चौकीत कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण व सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याची घटना घडली आहे. रोहन गौतम साळवे(रा. कल्याण, ता. हवेली) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी राहुल बाळकृष्ण कोल्हे(वय ३९ वर्ष, पोलीस हवालदार, राजगड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण) यांनी फिर्याद दिली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी(दि. १२ मे) रात्री ८ च्या सुमारास पोलिस हवलदार राहुल कोल्हे हे खेड शिवापूर पोलीस चौकीत कायदेशिर कर्तव्य बजावत होते. यावेळी आरोपी रोहन साळवे याने अचानक चौकी मध्ये प्रवेश करुन सरकारी कामात अडथळा निर्माण करत हवलदार कोल्हे यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने खुर्ची डोक्यात घातली. तसेच चौकीतील संगणक व इतर मालमत्तेची तोड-फोड करत ५० हजार रुपयांचे नुकसान करून पसार झाला असल्याचे पोलीस हवलदार राहुल कोल्हे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. राजगड पोलीस आरोपीचा शोध घेत असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.