फॅन्सी नंबरसाठी २०२३ मध्ये पुणेकरांनी मोजले ४७ कोटी; एका वाहनधारकाने तर पसंती क्रमांकासाठी तब्बल १२ लाख रुपये मोजल्याची आरटीओ कार्यालयात नोंद
पुणे : दुचाकी किंवा चारचाकी खरेदी करण्याआधी आपल्या वाहनाचा क्रमांक काय असावा, याची तयारी केली जाते. त्यानुसार अनेक वाहनमालक आरटीओमध्ये क्रमांकासाठी गर्दी होते. काही वाहनमालक तर वाट्टेल तेवढे पैसे मोजतात, आणि पाहिजे तोच नंबर मिळवतात.
अशाच फॅन्सी (चाॅईस) नंबरमधून पुणे आरटीओला मागील वर्षभरात तब्बल ४७ कोटी १४ लाखांचा महसूल मिळाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत २०२३ साली या महसुलात १४ कोंटीची वाढ झाल्याचे आरटीओतील आकडेवारीतून समोर आले आहे.
नवीन वाहन खरेदी केल्यानंतर हौशी वाहनमालक त्याच्यासाठी चॉईस नंबर घेतो. अनेकजण त्यांना लकी असलेले नंबर किंवा जन्मदिवसाची तारीख ही नंबरप्लेटच्या माध्यमातून गाडीला लावण्यासाठी आग्रही असतात. यासाठी परिवहन विभागाकडून देखील पैशांची आकारणी केली जाते. आवडीचा क्रमांक हवा असेल तर त्यासाठी विशीष्ट रकमेचा धनादेश भरून तो आरटीओ कार्यालयात जमा करावा लागतो. त्यानंतर हा नंबर संबंधित वाहनधारकासाठी राखीव करून ठेवण्यात येतो.
मात्र, एकाच नंबरसाठी दोन वाहनधारकांचे धनादेश आल्यास त्यातील सर्वाधिक रकमेच्या धनादेशधारकाला तो नंबर दिला जातो. यासाठी आरटीओ कार्यालयात लिलाव पद्धत देखील आहे. आरटीओच्या या चॉईस नंबर प्रक्रियेतून परिवहन विभागाला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
जानेवारी ते डिसेंबर २०२२ मध्ये आरटीओ कार्यालयाला एकूण ३३ कोटी ५० लाख ५७ हजार ८५१ रुपये महसूल मिळाला. तर, २०२३ मध्ये यात मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२३ मध्ये परिवहन विभागाला ४७ कोटी १४ लाख ९६ हजार ८०७ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. यामुळे २०२२ च्या तुलनेत १४ कोटींनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
एका चारचाकी वाहनधारकाने त्यांच्या कारला १ नंबर असावा, यासाठी तब्बल १२ लाख रुपये मोजल्याची नोंद आरटीओ कार्यालयात करण्यात आली आहे. विशेषतः एक ते दहा या क्रमांकासाठी सर्वाधिक पैसे मोजले जातात.
चॉईस नंबरच्या माध्यमातून पुणे आरटीओ कार्यालयाला २०२३ या वर्षभरात एकूण ४७ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. चॉईस नंबरसाठी नागरिकांची चांगली पसंती मिळत आहे.
– संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.