लग्न समारंभात स्टेजवर भिंत आणि होर्डिंग कोसळल्याने वधु-वरांसहित अनेक लोक गंभीर जखमी; शिरवळ-शिंदेवाडी येथील अक्षय लॉन्स मधील घटना

शिरवळ : पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी(ता.खंडाळा) येथील अक्षय लॉन्स मंगल कार्यालय येथे लग्न समारंभासाठी असलेल्या स्टेजवर मागे असणारी भिंत आणि लोखंडी होर्डिंग कोसळून आज सोमवारी(दि. १३ मे) मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटने मध्ये वधु-वरांसहित अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारा करिता शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटल येथे नेण्यात आले आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, कामथडी(ता.भोर) येथील प्रणव साहेबराव वाल्हेकर आणि राजापूर(ता.भोर) येथील पायल रामभाऊ खुटवड यांचा विवाह सोहळा पुणे-सातारा महामार्गावरील अक्षय लॉन्स मंगल कार्यालय(शिंदेवाडी, ता.खंडाळा) येथे आज सोमवारी ६ वाजून १५ मि. आयोजित केला होता. लग्न समारंभ उरकल्यानंतर वधु-वरांना शुभेच्छा देण्यासाठी नातेवाईक स्टेज वर येत होते. आणि इतक्यात स्टेजच्या पाठीमागे असणारी १० ते १२ फूट विटांमध्ये बांधलेली भिंत लोखंडी होर्डिंग सहीत स्टेज वर कोसळली. या घटनेने कार्यालयातील उपस्थितांची एकच झुंबड उडाली. लग्न समारंभात उपस्थित असलेल्या सर्वांनी लगेचच स्टेज कडे धाव घेत भिंत बाजूला करण्यास सुरुवात केली. प्रत्येक जण स्टेज वरील एक एक वीट बाजूला करताना दिसत होता. परंतु सुदैवाने भिंती खाली अडकलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. तसेच यावेळी सूत्रसंचालन करत असलेले निवेदक विठ्ठल पवार हेही या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. तसेच वधु-वरांसहित अनेक जण या घटनेत गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारा करिता शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटल येथे नेण्यात आले आहे. यावेळी काही महिला तर हे दृश्य पाहून चक्कर येऊन बेशुद्ध पडल्या असल्याचे दिसून आले. खंडाळा तहसीलदार अजित पाटील यांच्याशी या दुर्घटनेबाबत संपर्क साधला असता, या दुर्घटनेशी संबंधित असणाऱ्या दोषींवर लवकरच कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page