कापुरहोळ-सासवड मार्गावर दिवळे गावच्या हददीत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू
कापूरहोळ : कापुरहोळ-सासवड मार्गावर दिवळे(ता.भोर) गावच्या हददीत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मनीष एकनाथ समगे(वय २८ वर्ष, सध्या रा. दिवळे, मूळ रा. कुंभोशी ता. पुरंदर) असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत हॉटेल व्यावसायिक माधव दत्तात्रय कापसे(वय २८ वर्ष, रा. कापुरहोळ, ता. भोर) यांनी फिर्याद दिली आहे. आज बुधवारी(दि. १५ मे) पहाटे या अपघाताची नोंद राजगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माधव कापसे यांचे बालाजी मंदिर परिसरात हॉटेल आहे. यामध्ये मयत मनीष समगे हा काम करत असे. मंगळवारी(दि. १४ मे) रात्री साडे अकराच्या सुमारास मनीष त्याच्या कडील ॲक्टिवा(एम एच १२ एमआर १४५२) दुचाकीवरून बालाजी मंदिरा वरून दिवळेच्या दिशेने येत असताना कापूरहोळ वरून सासवड कडे जाणाऱ्या भरधाव वाहनाने त्यास धडक दिली. या अपघातात मनीषचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस घटनास्थळी पोहचून त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन भोर येथील उपविभागीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्यांच्या नियमांकडे दुर्लक्ष करत चालवून या अपघातास कारणीभूत ठरून तसेच अपघाताची कोणतीही माहिती न देता पळून गेल्यामुळे त्याच्या विरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात आज बुधवारी(दि. १५ मे) पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार गणेश लडकत करीत आहेत.