लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या, हिंजवडीतील घटना; दोघांना अटक
हिंजवडी : प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी सुबोध सुधीर साखरे (वय २५ वर्ष, रा. साखरे वस्ती, हिंजवडी), व रोहन सुदाम पारखी (वय ३०, रा. मुलाणी वस्ती, माण, ता. मुळशी) यांना अटक केली आहे. तसेच सुधीर साखरे, सुबोध साखरे याची आई आणि एक महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांच्या १९ वर्षीय मुलीचे आरोपी सुबोध साखरे याच्यासोबत काही वर्षांपासून प्रेम संबंध होते. फिर्यादी यांच्या मुलीने त्यास लग्न कर असा तगादा लावला. परंतु, आरोपी सुबोध व त्याचे नातेवाईक यांनी आपसांत संगनमत करून लग्नास नकार दिला. काहीही झाले तरी लग्न लावून देणार नाही, असे म्हटले. यामुळे फिर्यादी यांची मुलगी तणावाखाली होती. या दरम्यान, फिर्यादी यांच्या राहत्या घरी या तरुणीने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.